- स्वदेश घाणेकर प्रो कबड्डी लीगनं महाराष्ट्रातील गावाखेड्यातील मराठमोळ्या कबड्डीपटूंना आपलं कौशल्य दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. गेल्या सहा मोसमात महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंनी प्रो कबड्डी लीगमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं. रिषांक देवाडिगा, विशाल माने, गिरीश ईर्नाक, काशिलींग अडके पासून ते गतमोसमाचा पोस्टर बॉय सिद्धार्थ देसाई यांनी महाराष्ट्राचा दबदबा दाखवून दिला आहे. आता या पंक्तित स्थान पटकावण्यासाठी मुंबईचा अजिंक्य कापरे उत्सुक आहे. यू मुंबाकडून 24 वर्षीय अजिंक्य प्रो कबड्डीमध्ये पदार्पण करणार आहे.
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होत आहे आणि पहिल्याच लढतीत यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाच्या या सलामीच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू अजिंक्यच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता. त्यानंतर पुढील मोसमात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी यू मुंबा सज्ज झाला आहे.
''प्रो कबड्डीत पदार्पणासाठी प्रचंड उत्सुक आहे. घरच्याच टीमकडून खेळण्याची संधी मिळाली याचा अधिक आनंद आहे. पहिल्याच सीजनसाठी कसून सराव केलेला आहे. उद्या पहिला सामना आहे, त्याची खूप उत्कंठा आहे. मी मुंबईचाच आहे आणि मुंबईच्याच संघाकडून खेळण्याची संधी मिळाल्याचं भाग्य लाभलं आहे,''अशी प्रतिक्रिया अजिंक्यनं दिली.
मुंबई शहरच्या 24 वर्षीय अजिंक्यनं वयाच्या 14व्या वर्षापासून कबड्डी खेळायला सुरुवात केली. शारदाश्रम शाळेतील त्याच्यासोबतची बहुतांश मुलं क्रिकेट खेळायची, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यानं त्यानं क्रिकेटचा मोह टाळला. त्याचे वडील सुरक्षारक्षक आणि आई गृहिणी आहे, त्यामुळे क्रिकेटचा खर्च त्याला परवडणारा नव्हता. पण, आज त्याला मेहनतीचं फळ मिळालं आहे. यू मुंबाने लिलाव प्रक्रियेत त्याला 10.25 लाखांत करारबद्ध केले. या रकमेचं काय करायचं याचा निर्णय आई-वडील घेतील, असे अजिंक्यने सांगितले.
तो म्हणाला,''वडील सिक्युरिटी गार्ड आहेत आणि आई गृहिणी आहे. मुलगा प्रो कबड्डीमध्ये खेळेल असं कधी त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण, त्यांना जेव्हा हे कळलं. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणीच आले. मी पहिला सामना कधी खेळतोय, याची माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक उत्सुकता आहे. त्यांनी काबाडकष्ट घेऊन आम्हाला घडवलं. त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले, त्यामुळेच मी इथवर पोहचू शकलो.''
एमडी महाविद्यालयात शिकत असताना त्याला देना बँकेने एका वर्षासाठी करारबद्ध केले. त्यानंतर युनियन बँकेने तीन वर्षांचा करार केला आणि सध्या तो BPCL कडून खेळतो. यू मुंबाच्या फ्युचर स्टार 2016च्या मोसमात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आणि त्याचं नशीबच पालटलं. 2017च्या फेडरेशन चषक स्पर्धेत आणि 2014-15च्या पश्चिम विभागीय विद्यापीठ स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर महाराष्ट्राला 2018च्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून देण्यात त्याचाही वाटा होता.