गोळाफेकपटू कृष्णा पुनीया बनली आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 03:42 PM2018-12-12T15:42:02+5:302018-12-12T15:46:51+5:30
राजस्थानातून काँग्रेसतर्फे विजयी, ऐझवाल फूटबॉल क्लबचे मालकही जिंकले निवडणूक
ललित झांबरे : अलीकडच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाचा फायदा खेळाडूंनाही झाला आहे. या निवडणूकीत राष्ट्रकूल सामन्यांतील माजी सुवर्ण पदक विजेती गोळाफेकपटू कृष्णा पुनिया हीसुध्दा काँग्रेसतर्फे निवडून आली आहे. राजस्थानमधील सदलपूर मतदारसंघातून ती १८ हजारापेक्षा अधिक मतांनी निवडून आली आहे. राजकारणाच्या मैदानात ती प्रथमच जिंकली आहे, कारण २०१३ च्या निवडणूकीत ती पराभूत झाली होती.
कृष्णाने २०१० च्या दिल्ली राष्ट्रकूल सामन्यांमध्ये ६१.५ मीटर अंतरावर गोळाफेक करुन सुवर्णपदक जिंकले होते. यासह ती राजकारणात सफल ठरलेले खेळाडू अस्लम शेरखान, चेतन चौहान, नवज्योतसिंह सिध्दू, राज्यवर्धन राठौड, ज्योतीर्मयी सिकदर, किर्ती आझाद यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.
कृष्णाप्रमाणेच मिझोरममधील निवडणूकीत ऐझवाल फुटबॉल क्लबचे मालक रॉबर्ट रॉयटे हेसुध्दा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. मिझोरम पूर्व २ मतदारसंघातून ते मिझो नॅशनल फ्रंटकडून निवडून आले आहेत. विद्यमान केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठौड हे २०१४ च्या निवडणूकीत जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे सी पी जोशी यांचा तीन लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता.
मध्यम पल्ल्याची धावपटू ज्योतीर्मयी सिकदर ही पश्चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून माकपाची उमेदवार म्हणून निवडून आली होती. ऑलिम्पिक हॉकीपटू अस्लम शेरखान हे १९८४ व १९९१ मध्ये मध्यप्रदेशच्या बैतूल लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार होते. किर्ती आझाद हे भाजपाचे तीन वेळा खासदार आहेत. १९९९, २००९ व २०१४ मध्ये ते दरभंगा मतदारसंघातून विजयी झाले होते.
काँग्रेसचे नवज्योतसिंग सिध्दू हे पंजाबच्या विद्यमान मंत्रिमंडळात पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आहेत त्याआधी ते भाजपाचे खासदारही राहिलेले आहेत. चेतन चौहान हे उत्तरप्रदेशातील भाजपा सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहेत. उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदारसंघाचेही ते दोन वेळा खासदार होते.