नवी दिल्ली :उत्कृष्ट पदलालित्यामुळे चाणाक्ष फुटबॉलपटू बनलेला सुनील छेत्री याच्यासारखा शानदार खेळाडू ‘दशकात एकदा’ घडतो असे सांगून, पुढील किमान पाच वर्षे त्याची जागा घेऊ शकेल, असा खेळाडू मला तरी दिसत नसल्याचे मत भारतीय संघाचे कोच इगोर स्टिमक यांनी व्यक्त केले.
स्टिमक यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बोलताना हे उद्गार काढले. ते म्हणाले, ‘छेत्री निवृत्त होईल तेव्हा त्याची उणीव भरून काढण्यासाठी संघातील सर्व खेळाडूंना शिस्तबद्ध सांघिक कामगिरीचे दर्शन घडवावे लागेल.’ छेत्रीनंतर संघाचे काय होईल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ते पुढे म्हणाले, ‘प्रामाणिकपणे बोलायचे तर हा प्रश्न आला की मी देखील संभ्रमात सापडतो. माझ्या संघात असलेला छेत्री नावाचा खेळाडू दशकात एकदाच घडतो. अनेकदा छेत्री कधी निवृत्त होईल आणि त्याच्यानंतर संघाचे काय, असा प्रश्न पुढे येतोच. माझ्या मते छेत्रीला खेळाचा आनंद लुटू द्या. असे प्रश्न विचारून आपण त्याच्यावर दडपण तर आणत नाही ना, असा माझा उलट प्रश्न आहे.’
छेत्रीकडे आणखी कितीतरी वर्षे आहेत. खेळाचा आनंद घेत हा खेळाडू संकटाच्यावेळी गोल नोंदवितो. निवृत्तीनंतर संघात त्याचे स्थान भरावेच लागेल. मात्र, छेत्रीची उणीव एका खेळाडूने नव्हे, तर संपूर्ण संघाने दूर करावी यावर माझा भर असेल, असे स्टिमक यांनी सांगितले.
संघावर छेत्रीचा किती प्रभाव आहे, असे विचारताच स्टिमक पुढे म्हणाले, ‘संघावर छेत्रीचा कमालीचा प्रभाव आहे. मात्र, तो कधीही मर्यादेपलीकडे न जाणारा खेळाडू आहे. कोचसोबत तो फार सकारात्मक वागतो. युवा खेळाडूंना वेळेचा कसा उपयोग करावा, यासाठी नेहमी मार्गदर्शन करतो.’
छेत्री नावाचा खेळाडू दशकात एकदाच घडतो. याच्यानंतर संघाचे काय, असा प्रश्न पुढे येतोच. माझ्या मते छेत्रीला खेळाचा आनंद लुटू द्या. असे प्रश्न विचारून आपण त्याच्यावर दडपण तर आणत नाही ना, असा माझा उलट प्रश्न आहे.’- इगोर स्टिमक, प्रशिक्षक