नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोविड-१९ महामारी कारणामुळे शनिवारी आॅनलाईन आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना वार्षिक राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरविले. हे खेळाडू अनेक शहरातून कार्यक्रमासाठी ‘लॉग इन’ झाले होते.यंदा ७४ खेळाडूंची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यात पाच खेलरत्न व २७ अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ६० खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ११ केंद्रातून व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी झाले.क्रिकेटपटू रोहित शर्मा (खेलरत्न) व ईशांत शर्मा (अर्जुन पुरस्कार) यांना कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. कारण ते इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी संयुक्त अरब अमिरातमध्ये आहेत; तर स्टार मल्ल विनेश फोगाट (खेलरत्न) व बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी (अर्जुन पुरस्कार) यांना कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे त्यांना कार्यक्रमात सहभागी होता आले नाही.रोहित व विनेश यांच्याव्यतिरिक्त तीन अन्य खेलरत्न पुरस्कराचे मानकरी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिक सुवर्णपदकविजेता मरियप्पन थांगवेलू आणि महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल यांना गौरविण्यात आले. ते आॅनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते.मनिका पुणे येथून तर थांगवेलू व राणी यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या बेंगळुरू केंद्रातून ‘लॉग इन’ केले. राष्ट्रपती कोविंद यांनी सहभागी झालेल्या पुरस्कार विजेत्यांची प्रशंसा केली. खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली व त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रपती भवनमधील दरबाल हॉलची उणीव जाणवली. येथे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराच्या ४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच विजेते, पाहुणे व गणमान्य व्यक्ती दरबार हॉलमध्ये एकत्र आले नाही.राष्ट्रपती कोविंद यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि २०२८ लॉस एंजिलिस आॅलिम्पिकमध्ये भारताला अव्वल १० मध्ये स्थान पटकावून देण्याचे लक्ष्य गाठू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.एक तास चाललेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाले, ‘सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन. तुम्ही आपल्या कामगिरीने भारतीयांना अविस्मरणीय क्षण प्रदान केले. सामूहिक प्रयत्नांनी भारत एक क्रीडा महाशक्ती म्हणून पुढे येईल, असा मला विश्वास आहे. भारतात क्रीडा संस्कृती निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. जग सध्या महामारीमुळे प्रभावित झाले असले तरी खेळाडू या अनुभवातून मजबूत होतील, अशी आशा आहे.७४ जणांना पुरस्कार देण्याचे समर्थननवी दिल्ली: यंदा ७४ जणांना राष्टÑीय क्रीडा पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी समर्थन केले. निवड समितीने पाच जणांना खेलरत्न तसेच २७ जणांना अर्जुन पुरस्कारासाठी निवडताच सर्व स्तरातून टीका झाली होती. द्रोणाचार्यसाठी १३ आणि ध्यानचंदसाठी १५ कोचेस निवडण्यात आले आहेत. रिजिजू यांनी या निर्णयाचे समर्थन करीत,‘ आमच्या खेळाडूंची आंतरराष्टÑीय कामगिरी झाल्याने आम्ही त्यांचा गौरव केला. पुरस्कार दिला नसता तर युवा खेळाडूंमधील उत्साह कमी होण्याची भीती होती,’ असे सांगितले. ही नावे आम्ही नव्हे तर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्र्तींच्या अध्यक्षतेखालील समितीने निवडली, या शब्दात त्यांनी आपल्या निर्णयार्थ पुष्टी जोडली.सलग चार वर्षांच्या कामगिरीच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात,असेही ते म्हणाले.पुरस्कार रकमेत झाली भरघोस वाढयंदा राष्टÑीय पुरस्काराची रक्कम वाढविण्यात येत असल्याची घोषणा क्रीडामंत्र्यांनी केली. राजीव गांधी खेलरत्नसाठी आधी ७.५ लाख दिले जायचे. यंदापासून ही रक्कम २५ लाख करण्यात आली. अर्जुन पुरस्कारासाठी ५ लाख दिले जायचे. यात १५ लाख अशी भरघोस वाढ करण्यात आली आहे. द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात येतील. याआधी २००८ मध्ये पुरस्कार रकमेत वाढ करण्यात आली होती. प्रत्येक दहा वर्षानंतर रकमेची समीक्षा होणे गरजेचे असल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितले.
खेळाडू ‘व्हर्च्युअली’ पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 3:41 AM