नवी दिल्ली : क्रीडाधोरण ठरविताना खेळाडूंनाच केंद्रबिंदू मानायला हवे; मात्र भारतात आजही अशी स्थिती नाही, असे मत भारताचा दिग्गज बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी याने व्यक्त केले.अडवाणी याने या मुद्द्यावर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्याशी बुधवारी चर्चा केली. तो म्हणाला, ‘‘खूप वेळा खेळाडूंना अधिकाऱ्यांच्या मागे फिरावे लागते. खरे तर खेळाडूचे सर्व लक्ष त्याच्या खेळावर असायला हवे. त्याला मदत करण्यासाठी अन्य काही जण असायला हवेत. मग यात साई असेल किंवा संबंधित खेळाची संघटना.’’ क्रीडामंत्र्यांशी कोणत्या बाबींवर चर्चा झाली हे सांगण्यास मात्र त्याने नकार दिला. अडवाणी म्हणाला, ‘‘काही बाबी संवेदनशील असल्यामुळे मी त्यांची आताच चर्चा करणार नाही. क्रीडामंत्र्यांनी मला मदत करण्याबाबत आश्वासन दिलेले आहे.’’ अडवाणीने भारतीय आॅलिम्पिक संघाबरोबर समन्वय करण्यासंदर्भातही तसेच आॅलिम्पिकमध्ये बिलियर्ड्सचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्याने गोयल यांची मदत मागितली.
क्रीडाधोरणाचा केंद्रबिंदू खेळाडूच हवा : अडवाणी
By admin | Published: May 11, 2017 12:42 AM