ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - बांगलादेश दौ-यात सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडियाचा झिम्बाब्वेे दौरा रद्द करण्यात आला आहे. खेळाडू थकल्याने हा दौरा रद्द केल्याचे कारण दिले जात असले तरी टेन स्पोर्ट्स व बीसीसीआय यांच्यातील वादामुळे या दौ-यावर आधीपासूनच अनिश्चिततेचे सावट होते.
भारतीय संघ १० ते २४ जुलै दरम्यान बांगलादेश दौ-यावर जाणार असून यात भारतीय संघ तीन वन डे व दोन टी - २० सामने खेळणार होता. मात्र हा दौ-याच्या प्रक्षेपणावरुन प्रसारणकर्ते टेन स्पोर्ट्स व बीसीसीआय यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादावर तोडगा निघत नसल्याने दौरा रद्द होण्याचे संकेत झिम्बाब्वेच्या क्रिकेट बोर्डाने दिले होती. सोमवारी दुपारी बीसीसीआयने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. खेळाडू थकल्याने व प्रसारणाच्या वादातून हा रद्द दौरा केल्याचे समजते. टीम इंडिया गेल्या वर्षाच्या अखेरीस न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेला होता. तिथून मग विश्वचषकानंतरच भारतीय संघ मायदेशी परतला होता. यानंतर आयपीएलचा हंगाम पार पडला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर खेळाडू बांगलादेशच्या दौ-यावर गेले आहेत. या व्यस्त कार्यक्रमाविषयी काही खेळाडूंनी तक्रार केली होती. अखेरीस बीसीसीआयने या तक्रारीची दखल घेतल्याचे दिसते.