नवी दिल्ली : कसोटी क्रिकेट रोमहर्षक आणि प्रेक्षकांना अनुकूल बनविण्याची जबाबदारी खेळाडूंची आहे. मी स्वत: कसोटीपटू बनण्यासाठीच क्रिकेट खेळणे सुरू केले होते, असे स्टार फलंदाज विराट कोहलीचे मत आहे.टीम इंडियाचा कसोटी कर्णधार असलेल्या विराटने मंगळवारी रात्री एका समारंभात क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांच्या ‘ड्रिव्हन द विराट कोहली स्टार’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.कार्यक्रमाला दिग्गज खेळाडू कपिल देव, सध्याचे कोच अनिल कुंबळे, माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, आशिष नेहरा, अंजुम चोप्रा, कोहलीचे कोच राजकुमार शर्मा आणि अन्य खेळाडू उपस्थित होते. सेहवाग म्हणाला, ‘‘कोहलीबद्दल मी सर्वांत आधी प्रदीप सांगवान याच्याकडून ऐकले. प्रत्यक्षात विराटची फलंदाजी पाहून चकित झालो.’’ कुंबळे यांनी कोहली हा स्वत:ला नव्हे, तर संघाला सज्ज करण्याची भूमिका बजाविणारा खेळाडू असल्याचे सांगितले. रवी शास्त्री यांनी सांगितले, ‘‘टीम इंडियाचा संचालक या नात्याने ड्रेसिंग रूममध्ये कोहलीच्या सहज स्वभावाचा मला परिचय झाला. तो निष्ठा बाळगतो. प्रामाणिकपणे काम करतो; शिवाय कुठलाही बहाणा करीत नाही. तो एका युवा संघाचा कर्णधार आहे.’’कोहलीचे कोच राजकुमार शर्मा म्हणाले, ‘‘विराटला बालपणापासून आव्हान स्वीकारण्याची सवय आहे. आत्मविश्वास अधिक असल्याने आपल्याला आव्हान मिळावे, असे तो नेहमी म्हणत असतो.’’ (वृत्तसंस्था)>मीच नव्हे, तर क्रिकेट सुरू करणाऱ्या प्रत्येकाला आपण टेस्ट कसोटीपटू व्हावे, असे वाटते. कसोटी क्रिकेटला आजही प्राधान्य दिले जाते. आम्ही कसोटीत कसे खेळतो आणि प्रेक्षकांना किती खिळवून ठेवतो, हे आमच्यावर अवलंबून आहे. नात्यांमध्ये माझ्यासाठी प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा आहे. १९९८ सालापासून राजकुमार शर्मा हेच माझे एकमेव प्रशिक्षक असून हे कधीही बदलणार नाही. आयपीएलसाठीही मी एकाच संघाकडून खेळलो असून हे देखील कधीच बदलणार नाही. - विराट कोहलीआमच्या तुलनेत सध्याचे खेळाडू सांघिक संस्कृती अधिक जोपासतात. समर्पण, शिस्त आणि कठोर मेहनत या बाबतीतही सध्याचे खेळाडू पुढे आहेत. आमच्यावेळी क्षेत्ररक्षण चांगले नव्हते; पण सध्याच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावला आहे.- कपिलदेव
कसोटी क्रिकेट रोमहर्षक बनविण्याची जबाबदारी खेळाडूंची : विराट कोहली
By admin | Published: October 20, 2016 6:29 AM