मुंबई : ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा आफ्रिका वंशाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. परंतु, हे यश मिळवत असताना त्यांनी दुसऱ्या देशांचे प्रतिनिधित्त्व केले. हे खेळासाठी अयोग्य असून हा प्रकार मानवी तस्करीसारखा आहे,’ अशी टीका भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) प्रमुख आदिल सुमारीवाला यांनी केली.मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एसजेएएम) वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुमारीवाला यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सरचिटणीस जय कोवली, माजी कुस्तीपटू आणि आघाडीचा कुस्तीपटू राहुल आवरे याचे प्रशिक्षक काका पवार आणि माजी आॅलिम्पियन नेमबाज व प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांचीही उपस्थिती होती.सुमारीवाला यावेळी म्हणाले की, ‘मला वाटते की, अरब देश बाहेरुन खेळाडू मागवतात. ते स्पर्धेपुरता त्यांचा वापर करतात आणि नंतर त्यांना त्यांच्या देशात पाठवतात. एकूण अरब देश जे काही करत आहेत ते चुकीचे आहे.’ त्याचप्रमाणे, ‘अरब देशांकडून खेळताना आफ्रिकी खेळाडू योग्य मार्गाने स्पर्धेसाठी पात्रता मिळवत नाही,’ असेही सुमारीवाला यांनी यावेळी म्हटले.या सर्व प्रक्रीयेमध्ये होत असलेल्या अनेक गैरव्यवहाराविषयी सुमारीवाला म्हणाले की, ‘आफ्रिकी खेळाडूंना अरब देशांचे नागरिकत्व दिले जात नाही. त्यांना केवळ घर दिले जाते. तसेच अवैध पासपोर्ट दिले जाते, ज्याआधारे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. स्पर्धेत भाग घेतल्यानंत त्यांना अक्षरश; फेकले जाते आणि हे मानवी तस्करी आहे. याविषयी मी आयएएएफच्या बैठकीमध्येही विरोध केला आहे.’ त्याचप्रमाणे यावेळी जय कोवळी, काका पवार आणि दिपाली देशपांडे यांनीही महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील आव्हाने, अडचणी यांसह सरकारकडून अपेक्षित असलेल्या मदतीविषयी विस्तृत चर्चा केली.
आफ्रिकी धावपटूंना खेळवणे म्हणजे ‘मानवी तस्करी’; एएफआय प्रमुख आदिल सुमारीवाला यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 2:37 AM