पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित केले होते. हे खेळाडू टोकियोला रवाना होण्यापूर्वी मोदींनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल उंचावले होते. त्यावेळी मोदी यांनी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिला वचन दिले होते, की टोकियोतून परत आल्यानंतर तुझ्यासोबत आईस्क्रिम खाईन.. रविवारी मोदींनी दिलेला शब्द पाळला अन् सिंधूसोबत आईस्क्रिम खाल्ले. सिंधूनं टोकियोत कांस्यपदक जिंकले आहे.
भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१२ मध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक जिंकले, तर भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला.