पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतून मायदेशी परतलेल्या खेळाडूंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी खेळाडूंशी गप्पा गोष्टी केल्याचे पाहायला मिळाले. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. भारतीय खेळाडूंची कामगिरीही उत्तम राहिली, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी खेळाडूंनीही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आपले अनुभव देशाच्या प्रतंप्रधानांसोबत शेअर केले.
ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंसोबत चर्चा करत असताना पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरील रीलच्या क्रेझसंदर्भातही खेळाडूंना प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला अनेकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतात, असे मी ऐकले आहे. तुमच्यातील किती लोक रील पाहतात आणि रील बनवतात? असा प्रश्न मोदींनी खेळाडूंना विचारला.
यावेळी हॉकी संघाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग याने ऑलिम्पिकदरम्यान सर्व संघातील खेळाडूंनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, हा गोष्ट सांगितली. भारतीय संघाचा कॅप्टन आणि 'सरपंच साहब' या नावाने फेमस झालेला हरपनप्रीत सिंग म्हणाला की, आम्ही सर्व टीम्सनी निर्णय घेतला होता की, ऑलिम्पिक दरम्यान कोणत्याही खेळाडूंनी मोबाईल फोनचा वापर करायचा नाही. चांगल्या वाईट कमेंट्स विपरित परिणाम करु शकतात. त्यामुळे सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय सर्वांनी घेण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय योग्यच होता असा रिप्लाय दिला. एवढेच नाही तर हा संदेश देशातील युवा पिढीसाठी उपयुक्त ठरेल, असा उल्लेखही केल्याचे पाहायला मिळाले.
हॉकी संघातील कॅप्टन हरमनप्रीत सिंग याला मोदीजींनी 'सरंपच साहब' असेच संबोधित केले. त्याच्याप्रमाणे आणखी कोणाला टोपणनावाने बोलवले जाते का? असा प्रश्नही मोदींनी खेळाडूंना विचारल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नेमबाजीत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या श्रेयसी सिंह हिने आपल्या निकनेमचा किस्सा शेअर केला. मी आमदार आहे त्यामुळे मला 'विधायक दीदी' अशी हाक मारली जाते, असा किस्सा तिने शेअर केला.