नवी दिल्ली - भारतीय पुरुष हॉकी संघाने आज जपानच्या भूमीवर इतिहास रचला. जर्मनीबरोबर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. गेली 41 वर्षे भारतीय संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य सामन्यात खेळला नव्हता. मात्र, टोकियोमध्ये भारताने केवळ उपांत्य फेरीच गाठली नाही, तर कांस्यपदकावरही कब्जा केला. आज संपूर्ण देश भारतीय हॉकी संघाचे कौतुक करत हा विजय साजरा करत आहे. यातच, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि हॉकी संघाचे अभिनंदन केले. पंतप्रधानांच्या या फोनचा व्हिडिओही आता व्हायरल होत आहे. (PM Narendra Modi speaks to india hockey team captain manpreet singh and coach graham reid phone call video viral)
तुम्ही कमाल केली -पंतप्रधान नरेंद्र मोदी हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगच्या फोनवर बोलले. मनप्रीतसोबत बोलताना मोदी म्हणाले, "तुम्ही कमाल केली आहे आणि आज संपूर्ण देश नाचत आहे. संपूर्ण संघाने खूप मेहनत घेतली. माझ्यावतीने संपूर्ण संघाचे अभिनंदन करा." याच बरोबर, पंतप्रधान मोदींनी संघाच्या दोन्ही प्रशिक्षकांशीही संवाद साधला. तसेच, 15 ऑगस्टनिमित्त सर्व खेळाडूंना आमंत्रितही केले.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरूनही संपूर्ण संघाचे अभिनंदन केले होते. "ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील. कांस्य पदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे," असे ट्विट त्यांनी केले होते.
1980 नंतर जिंकलं ऑलिम्पिक पदक -यापूर्वी भारतीय हॉकी संघाने 1980 साली ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर भारताला एकाही ऑलिम्पिक स्पर्धेत पदकावर नाव कोरता आले नव्हते. मात्र, यावेळी ऑलिम्पिकमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण उपांत्य फेरीत भारताला २-५ ने पराभव पत्करावा लागला होता. यामुळे हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले होते. मात्र आज जर्मनीवर मात करत भारताने कांस्यपदकावर नाव कोरले.