नवी दिल्ली - भारतीय तलवारबाज सीए भवानी देवी (Bhavani Devi) हिचा काल (26 जुलै) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. यानंतर तिने एक ट्विट करून देशवासीयांची माफी मागितली. यावर तिचे हे ट्विट रिट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिला धीर देत तिचे कौतुक केले आहे. (PM Narendra modi reply to bhavani devis tweet about her performance in olympics 2020)
काय होते भवानी देवीचे ट्विट? -"आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. प्रचंड उत्साह आणि भावनांनी भरलेला होता. मी पहिल्या सामन्यात नादिया अझिझिला 15/3 ने पराभूत केले आणि ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी पहिली महिला ठरले. पण, दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनॉन ब्रुनेटकडून माझा 7/15 अशा फरकाने पराभव झाला. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले. पण जिंकू शकले नाही. मला क्षमा करा," असे ट्विट भवानी देवीने केले होते.
भारताला तुझ्या योगदानाचा अभिमान -यानंतर, पंतप्रधान मोदींनी भवानीदेवीचे हेच ट्विट रिट्विट करत, "तू सर्वोत्तकृष्ट प्रयत्न केलेस आणि त्यालाच सर्वात जास्त महत्त्व आहे. विजय आणि पराभव हा जीवनाचा भाग आहे. भारताला तुझ्या योगदानाचा अभिमान आहे. देशवासीयांसाठी तू एक प्रेरणास्रोत आहेस," असे म्हटले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिने पटकावला आणि तिने पहिला सामनाही जिंकला.
दुसऱ्या सामन्यात तिला पराभव पत्करावा लागल्यानं ऑलिम्पिक पदकाचे तिचे स्वप्न भंगले. मात्र, हा शेवट नसून ही सुरूवात आहे, असा मनाशी पक्का निर्धार करून तिनं पुढील फ्रान्समध्ये ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले आहे. ''प्रत्येक शेवट हा नव्या प्रवासाची सुरुवात असतो. मी अजून मेहनत घेईन आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावून देशाचा तिरंगा फडकवेन. माझे कोच, सहाय्यक प्रशिक्षक आणि मला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचे आभार,'' असेही तिने म्हटले आहे.