Vinesh Phogat disqualified, Wrestling India in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आले. क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत विनेशने काल अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण आज पुन्हा वजन केल्यानंतर तिचे वजन ५० किलोपेक्षा थोडे जास्त असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. विनेश फोगाट अपात्र ठरल्यावर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी तिच्यासाठी ट्विट करत तिला मोलाचा संदेश दिला.
"विनेश, तू मोठी चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहात. आजचा भारताला बसलेला धक्का दु:खदायक आहे. मला झालेले दु:ख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या निर्णयाने साऱ्यांनाच प्रचंड निराशा झाली आहे. पण, मला माहित आहे की तू फायटर आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. दमदार पुनरागमन कर! आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत," असे धीर देणारे ट्विट मोदींनी केले.
मोदी यांची IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या धक्क्यानंतर भारताकडे कोणकोणते पर्याय आहेत, याबद्दल प्रथम माहिती घेतली. विनेश प्रकरणात सर्व पर्यायांचा शोध घेण्याची विनंती मोदींनी पीटी उषा यांच्याकडे केली.
दरम्यान, विनेशला भारताची पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू बनण्याची संधी मिळाली होती. विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्याने भारतीयांना धक्का बसला आहे. विनेशचे वजन ५० किलोपेक्षा जास्त भरत आहे. रात्रभर तिचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र तरीही आज सकाळी तिचे वजन ५० किलो पेक्षा जास्त भरले. यामुळे विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले आहे.