मुंबई : नियोजनबद्ध खेळ, आक्रमक चाली, भक्कम बचाव आणि जबरदस्त सांघिक खेळ या जोरावर तुफान आक्रमण केलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) संघाने मुंबई सुपर लीग हॉकी स्पर्धेत धमाकेदार विजयाची नोंद करताना ऱ्हेमा स्पोटर््स संघाचा ९-० असा चुराडा करून आगेकूच केली. अन्य एका सामन्यात बलाढ्य भारतीय नौदलाने विजयी कामगिरी कायम ठेवताना अभी फाउंडेशनला ४-२ असे नमवले.मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडच्या (एमएचएएल) वतीने मुंबई हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पीएनबीच्या शानदार खेळापुढे ऱ्हेमा संघाच्या खेळाडूंनी सपशेल शरणागती पत्करली. कर्णधार जीतेंद्र सरोहासह, अजितेश रॉय आणि दमनदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल करताना पीएनबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तर जुगराज सिंग, सुमीत पाल आणि हरदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून ऱ्हेमाला नमवले.आक्रमक सुरुवात केलेल्या पीएनबी संघाने अजितेश रॉयने केलेल्या वेगवान गोलच्या जोरावर आघाडी घेतली. यानंतर जितेंदर (१७) आनि जुगराज सिंग (३१) यांनी गोल करून संघाला मध्यंतराला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात ऱ्हेमा संघ कडवी टक्कर देईल अशी अपेक्षा होती. मात्र तुफान फॉर्ममध्ये असलेल्या पीएनबीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. या गोलसंख्येत जितेंद्र (४४), दमनदीप (४६), हरदीप (५०), सुमीत (५२), दमनदीप (६८) आणि अजितेश (७०) यांनी गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.तत्पूर्वी झालेल्या अन्य एका एकतर्फी सामन्यात भारतीय नौदलाने अपेक्षित कूच करताना अभी फाउंडेशनला ४-२ अशी धडक दिली. सुमन किंडोने अनुक्रमे २०व्या आणि ३८व्या मिनिटाला सलग दोन गोल नोंदवून संघाला दिमाखदार आघाडी मिळवून दिली. राणा प्रतापने ४२व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी ३-० अशी केली. यानंतर अभी संघाने चांगली लढत दिली. कनवरजीत सिंगने ४८व्या मिनिटाला गोल करून संघाची पिछाडी १-३ अशी केली. मात्र नितेश एस. याने ५४व्या मिनिटाला गोल करून पुन्हा नौदलाची आघाडी ४-१ अशी वाढवलीत्याचवेळी ५८व्या मिनिटाला गोविंद सिंगने महत्त्वपूर्ण गोल करून अभी संघाची पिछाडी २-४ अशी कमी केली. या वेळी काहीसा आक्रमक खेळ करताना अभी संघाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र या वेळी कोणताही अतिरिक्त धोका न पत्करता भारतीय नौदल संघाने भक्कम बचावाच्या जोरावर अभी संघाला रोखत अखेर ४-२ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. (क्रीडा प्रतिनिधी)
पीएनबीचा ९ गोलचा धडाका
By admin | Published: September 11, 2015 12:34 AM