त्रिनिदाद : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणा-या आगामी वन-डे विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ घोषित करण्यात आला आहे़ या संघातून अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि किरोन पोलार्ड यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे़ संघाच्या कर्णधारपदी २३वर्षीय जेसन होल्डर याची निवड करण्यात आली आहे़ वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि प्लेयर्स संघटनेसोबत असलेल्या कराराच्या वादामुळे ब्राव्होच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाने भारताचा दौरा अर्धवट सोडला होता़ यासाठी ब्राव्हो आणि पोलार्ड यांनाच दोषी मानले जात आहे़ त्यामुळेच त्यांना शिक्षा म्हणून संघातून डच्चू देण्यात आल्याची चर्चा आहे़संघाचे कर्णधारपद २३वर्षीय जेसन होल्डर याच्याकडे सोपविण्यात आले आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी मार्लोन सॅम्युअल्स याच्याकडे सोपविण्यात आली आहे़ वेगवान गोलंदाज केमार रोच आणि अनुभवी फलंदाज डॉरेन ब्राव्हो यांचा संघात समावेश करण्यात आला आहे़ निवड समितीचे अध्यक्ष क्लाईव्ह लॉईट म्हणाले, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये हा संघ नक्कीच आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करील असा विश्वास आहे़ हा संघ जर पूर्ण क्षमतेने खेळला, तर विश्वचषक विंडीजमध्येच येईल, असेही ते म्हणाले़ (वृत्तसंस्था)
विश्वचषक संघातून पोलार्ड, ब्राव्हो ‘आउट’ वेस्ट विंडिज संघ घोषित
By admin | Published: January 12, 2015 1:35 AM