मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात नाबाद ६१ धावांची आकर्षक आणि निर्णायक खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याने ५ धावांनी मिळालेल्या विजयाचे श्रेय आपला सहकारी खेळाडू केरॉन पोलार्ड याच्या अखेरच्या शानदार षटकाला दिले आहे. या महत्त्वपूर्ण लढतीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेआॅफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्यापही जिवंत आहेत.हार्दिक पांड्याच्या ८ चौकार व दोन षटकारांसह ३१ चेंडूंत केलेल्या ६१ धावांच्या बळावर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबईने २० षटकांत १७१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या केकेआर संघ २० षटकांत १६६ धावाच करू शकला. केकेआरला विजयासाठी अखेरच्या षटकात १२ धावांची गरज होती; परंतु पोलार्डने आपल्या अखेरच्या षटकांत फक्त सहाच धावा खर्च केल्या.सामन्यानंतर पांड्या म्हणाला, ‘‘निश्चितच या विजयाचे श्रेय पोलार्डच्या चांगल्या गोलंदाजीला द्यायला हवे. युसूफ पठाण चांगला खेळत होता आणि तो स्ट्राईकवर होता. पोलार्डने युसूफला पहिल्याच चेंडूंवर बाद केले आणि त्यानंतर अखेरच्या षटकात त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची संधी मिळू दिली नाही. माझ्या तुलनेत अंतिम षटक जास्त महत्त्वाचे होते. कारण पूर्ण सामन्याचा निकाल या षटकावर अवलंबून होता.’’पोलार्डच्या ३८ चेंडूंतील नाबाद ३३ धावांविषयी विचारल्यानंतर पांड्या याने, केरॉनने त्याची भूमिका सुरेख बजावली आणि आपल्याला मोकळे खेळण्यास प्रोत्साहित केले, असे सांगितले.स्फोटक खेळीविषयी विचारले असता पांड्या म्हणाला, ‘‘मी नेहमीच असाच खेळतो. हा माझा नैसर्गिक खेळ आहे आणि पूर्ण कारकिर्दीतच मी असेच खेळलो आहे.’’ (वृत्तसंस्था)
पोलार्डचे अखेरचे षटक जास्त महत्त्वाचे : पांड्या
By admin | Published: May 16, 2015 2:26 AM