ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबई इंडियन्सचा फलंदाज किरोन पोलार्ड कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल सामन्यादरम्यान मोक्याच्या क्षणी बाद होताच समालोचक संजय मांजरेकर याने केलेल्या वक्तव्यावर तो जाम भडकला. भो-भो करणे संजय मांजरेकरची जुनीच सवय असल्याची प्रतिक्रिया पोलार्डने दिली आहे.पोलार्डने १७ चेंडूंत १७ धावा काढल्यानंतर तो बाद होताच मुंबई इंडियन्सच्या ५ बाद ११९ धावा होत्या. संघाला १७९ धावांचे लक्ष्य गाठायचे होते आणि केवळ चार षटके शिल्लक होती. मांजरेकर समालोचन करीत असताना त्यांनी पोलार्डवर टीका केली. सहकारी समालोचकाने मांजरेकर यांना पोलर्डसाठी फलंदाजीचे आदर्श स्थान कोणते, असा प्रश्न केला. त्यावर पोलार्ड डावाच्या शेवटी सहा किंवा सात षटकांत फलंदाजी करण्यासाठी योग्य असल्याचे मांजरेकरचे मत होते.मांजरेकरच्या टीकेमुळे रागावलेल्या पोलार्डने टि्वट करीत लिहिले, बोलण्यासाठी पैसा मिळतो म्हणून मांजरेकर तुम्ही काहीही बरळण्यास मोकळे आहात का? तुम्ही भो-भो करणे सुरू ठेवू शकता. मला इतका पैसा का मिळतो, हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का. मी इतका पैसा मिळविण्याचा हकदार आहे. शब्दात मोठी ताकद असते. एकदा शब्द बाहेर पडले की परत घेता येतनाहीत. शब्द जरा जपून वापर, असंही पोलार्ड म्हणाला आहे.