बाकू : आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात पूजा घाटकर हिचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताला ज्याच्याकडून पदकाच्या सर्वाधिक आशा असलेला जीतू राय मात्र पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकाराची अंतिम फेरी गाठण्यास अपयशी ठरला. त्याशिवाय प्रकाश नंजप्पा आणि अपूर्वी चंदेला हेही ‘बाहेर’ पडले.पूजाने पात्रता फेरीत एकूण ४१७.० गुणांचा वेध घेत सातवे स्थान पटकावून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत तिला १६४.७ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी चीनची दू वेई (२०८.६) हिने सुवर्णवेध घेत आपला दबदबा राखला, तर चीनच्याच ही शी मेंग याओ (२०८.३) आणि कोरियाच्या पार्क हेई मी (१८५.१) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले. पूजाने यावेळी पदकाच्या शर्यतीमध्ये स्वत:चे स्थान मजबूत केले होते; परंतु सातव्या सीरिजमध्ये थोड्याशा अंतराने पिछाडीवर पडल्याने तिचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. दरम्यान, या स्पर्धेत भारताचे अंजूम मुदिल (४१६.४) आणि अपूर्वी चंदेला (४११.७) यांनी अनुक्रमे नववे आणि ४२वे स्थान पटकावले. पुरुषांच्या गटात भारताला मोठा धक्का बसला. रिओ आॅलिम्पिकसाठी भारताचे आशास्थान असलेला जीतू राय ५५५ गुणांसह दहाव्या स्थानी राहिला.
पूजाचे कांस्य हुकले; जीतू, प्रकाशकडूनही निराशा
By admin | Published: June 25, 2016 2:42 AM