नवी दिल्ली : क्रिकेटमधील साफसफाईच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयमध्ये ‘एक राज्य एक संघटना’ ही न्या. आर. एम. लोढा यांची शिफारस मान्य झाल्यास क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारला (सीएबी) पुन्हा मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बिहारला बीसीसीआयची मान्यता मिळावी, यासाठी सातत्याने लढा देत असलेले सीएबीचे सचिव आदित्य वर्मा यांनी लोढा समितीच्या शिफारशींमुळे बिहार क्रिकेट पुन्हा राष्ट्रीयस्तरावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. बुधवारी वर्मा म्हणाले, ‘‘बिहारमध्ये क्रिकेट नियमित करण्यावर लोढा समितीने भर दिल्यामुळे युवा क्रिकेटपटूंना नवजीवन मिळेल, अशी आशा आहे. बीसीसीआयकडे मतदानाचा पूर्ण अधिकार असलेले ३० सदस्य आहेत. एकट्या महाराष्ट्रात चार, गुजरातेत तीन, तसेच प. बंगाल आणि आंध्रमध्ये प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे. बिहारकडे सदस्यत्व नाही. हा राज्यातील जनतेचा अपमान ठरतो. बिहार १९३५ पासून बीसीसीआयचा सदस्य आहे. पण २००० मध्ये झारखंड वेगळे झाल्यापासून बिहारने मतदानाचा अधिकार व पूर्ण सदस्यत्व गमावले. बिहार संघ बीसीसीआयच्या एकाही स्पर्धेत सहभागी होत नाही. बीसीसीआयकडून आर्थिक मदतही मिळत नाही. लोढा समितीची शिफारस लागू करीत सीएबीला पूर्ण राज्य संघटनेचा दर्जा देण्याची मागणी वर्मा यांनी केली आहे. देशात क्रिकेटचा समान रूपाने विकास व्हावा, शिवाय पूर्णकालीन सदस्यांसोबत असोसिएट सदस्यांना स्पर्धेत सहभागाची संधी मिळावी, असे लोढा समितीने शिफारशीत म्हटल्याकडे वर्मा यांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)
बिहारला मान्यतेची शक्यता
By admin | Published: January 07, 2016 12:16 AM