नवी दिल्ली : अनुभवी प्रशासक जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयमध्ये गट पडले असून, पूर्व विभागाने आपल्या उमेदवाराला मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला नवे वळण प्राप्त झाले आहे. पूर्व विभागातील सर्व संलग्न संघटना अध्यक्षपदासाठी झारखंड संघटनेचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवार व राजीव शुक्ला यांच्या नावाचीही चर्चा आहे; पण या दोन्ही अनुभवी राजकारण्यांना पूर्व विभागातून सूचक व अनुमोदक मिळविणे सोपे नाही. पूर्व विभागात सहा मते आहेत. त्यात बंगाल, आसाम, झारखंड, ओडिशा, त्रिपुरा आणि राष्ट्रीय क्रिकेट क्लब (एनसीसी) यांचा समावेश आहे. सध्या अशी शक्यता आहे की, शुक्ला किंवा पवार यांनी आपली उमेदवारी सादर केली तर निवडणूक होईल आणि निवड सर्वानुमते होणार नाही.पूर्व विभागातील पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये एकमेकांसोबत चर्चा केलेली असून, २०१७ पर्यंत अध्यक्षपदी आपल्या विभागातील व्यक्ती असावी, यावर एकमत झाले आहे. पूर्व विभागातील किमान चार संघटनांचा त्यांना पाठिंबा राहील. आमच्या मते २०१७ पर्यंत या पदावर पूर्व विभागातीलच व्यक्ती असावी, असे आमचे मत आहे. जर असे घडले नाही तर निवडणुकीची शक्यता नाकारता येणार नाही. पवार जर निवडणूक लढणार असतील तर कॅब आणि एनसीसी दालमियाच्या कौटुंबिक क्लबप्रमाणे त्यांच्या बाजूने मतदान करणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.’सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण ३० पैकी १० मतांवर त्यांचे नियंत्रण आहे. कोषाध्यक्ष हरियाणाचे अनिरुद्ध चौधरी यांच्याप्रमाणे अमिताभ चौधरी हेसुद्धा श्रीनिवासन यांच्या विश्वासातील असल्याचे मानले जाते. पूर्व विभागात श्रीनिवासन यांना आसाम, बंगाल, ओडिशा आणि झारखंड यांचे समर्थन प्राप्त आहे. बीसीसीआयच्या आमसभेची विशेष बैठक प्रस्तावित १५ दिवसांनी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. स्वत:ची इच्छा, दुसरीकडे अंगुलीनिर्देश!नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुरब्बी राजकारणी आहेत. प्रत्येक खेळी ते विचारपूर्वक खेळतात. जगमोहन दालमियांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्याची त्यांची इच्छा दिसते. आधीही या पदावर राहिलेल्या पवारांची तशी इच्छा आहे, पण आपण या रेसमध्येच नाही, असे भासविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. कुणाच्यातरी खांद्यावर बंदूक ठेवून ते अध्यक्षपदाच्या खुर्चीवर नेम साधण्याच्या तयारीत आहेत.विदर्भातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी सोमवारपासून नागपुरात ते तळ ठोकून आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पिकांची झालेली वाताहत याची पाहणी करण्यासाठी आलेले पवार येथे बसून क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान होता येईल का, याचीही चाचपणी करीत आहेत. मंगळवारी त्यांनी सर्व वर्तमानपत्रांतील संपादकांसोबत संवाद साधला. या वेळी शेतकरी आत्महत्या ते बीसीसीआय अध्यक्षपद या सर्व मुद्यांवर चर्चा गाजली. बीसीसीआयमध्ये दालमिया यांचा उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न पवारांच्या पुढ्यात येताच राजकारणातील या गूढ व्यक्तिमत्त्वाकडून उत्तरही तसेच मिळाले. त्यांनी ‘आॅफ द रेकॉर्ड’चे पत्ते खेळले. पवार हसून म्हणाले,‘‘अॅड. शशांक मनोहर पुन्हा अध्यक्षपदी विराजमान व्हावेत, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. पण, मनोहर यांनी नकार दिला. दुसरीकडे राजीव शुक्ला यांचीदेखील अध्यक्ष बनण्याची इच्छा आहे. पुढे काय होते पाहू या!’’ पवारांच्या या दोन वाक्यात बीसीसीआयमधील भविष्यातील घडामोडींचे संकेत दिसले. (क्रीडा प्रतिनिधी)
निवडणूक होण्याची शक्यता
By admin | Published: September 23, 2015 12:01 AM