नवी दिल्ली : भारत-वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे उभय देशांत टी-२० मालिकेचे आयोजन करण्याविषयी चर्चा होणार आहे.बीसीसीआय आणि विंडीज क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये पुढील महिन्यात फ्लोरिडात टी-२० मालिका आयोजन करण्यासंदर्भात आगामी बुधवार, गुरुवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. कसोटी मालिका आटोपताच टी-२० मालिका होऊ शकते का, याची चाचपणी बैठकीत केली जाईल. कसोटी मालिकेचा समारोप २२ आॅगस्ट रोजी त्रिनिदाद येथे होईल. २४ आॅगस्ट ते २७ आॅगस्ट आणि २८ आॅगस्ट हे दिवस टी-२० सामन्यांचे आयोजन करण्यासाठी उपलब्ध असतील. याआधी २०१२ मध्ये वेस्ट इंडीजने न्यूझिलंडविरुद्ध अमेरिकेत दोन टी-२० सामने खेळले होते, पण आयसीसीने जून २०१५ मध्ये अमेरिकेच्या क्रिकेट बोर्डावर निलंबन बजावले. आॅगस्टमधील मालिकेला मंजुरी मिळाल्यास २०१२ नंतर अमेरिकेत ही पहिलीच मालिका असेल. (वृत्तसंस्था)
भारत-विंडीज टी-२० मालिकेची शक्यता
By admin | Published: July 29, 2016 3:21 AM