दिल्ली : भारतीय टेनिस जगतातील दिग्गज जोडी लिएंडर पेस आणि महेश भूपती हे रिओ आॅलिम्पिकमध्ये एकत्र खेळण्याची शक्यता आहे. या दोघांनी भारतीय टेनिसवर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, काही समज-गैरसमजांमुळे या दोघांमध्ये बऱ्याचदा फूटही पडली होती. या सर्व कडू आठवणी बाजूला सारत ही जोडी पुन्हा कोर्टवर एकत्र खेळताना दिसेल.
हे दोन्ही दिग्गज मुंबईत काही दिवसांपूर्वी भेटले होते. या दोघांनी देशासाठी पदक जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखविली. या जोडीने शेकडो विजेतेपदे मिळवून दिली आहेत. मात्र, आॅलिम्पिकमध्ये या जोडीला यश मिळाले नाही. पेसने १९९६ मध्ये अटलांटा आॅलिम्पिकमध्ये एकेरीत कांस्यपदक पटकाविले होते. मात्र, दुहेरीत ही जोडी आजही पदकाच्या शोधात आहे.
पेस-भूपती या जोडीत २००६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान वाद निर्माण झाले होते. हे वाद इतके वाढले होते की त्यांनी वेगळे खेळण्याचा निर्णय घेतला होता. पेस म्हणाला होता की, आम्ही चांगले मित्र आहोत; पण जोडी म्हणून खेळणार नाही. देशाच्या हितासाठी ही जोडी पुन्हा एकदा २००८मध्ये एकत्र आली. बिजिंग आॅलिम्पिकमध्ये या जोडीने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर २०११ मध्ये ही जोडी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळताना दिसली. या स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.