लंडन : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल हुसेन पुन्हा एकदा उमेदवार होण्याची शक्यता आहे. गेल्या मे महिन्यात झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सॅप ब्लेटर यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या अली यांनी याबाबत संकेत दिले आहेत. फिफाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरणार असल्याचे प्रिन्स यांनी संकेत दिले आहेत. अन्य देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल महासंघांसोबत चर्चा सुरू असल्याचे अली यांनी सांगितले. ३९ वर्षीय अली यांना फिफा अध्यक्षपदासाठी मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत १३३-७३ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. निवडणुकीत सरशी साधल्यानंतर चार दिवसांनी ब्लेटर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. अध्यक्षपदाचा वारसदार न मिळाल्यामुळे ब्लेटर यांना या पदावर कायम राहावे लागले. फिफाच्या अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी फेब्रुवारीत निवडणूक होणार आहे. अली यांनी सांगितले की,‘मी विविध देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल महासंघांसोबत चर्चा करीत आहे. त्यांचे मत जाणून घेत असून, भविष्याबाबत योजना आखत आहे. नव्या विचारसरणीची व सकारात्मक विचार करणारी व्यक्ती फिफाच्या अध्यक्षपदाची उमेदवार असावी, असे माझे मत आहे.(वृत्तसंस्था)
प्रिन्स अली फिफा अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता
By admin | Published: September 09, 2015 2:31 AM