किशोर बागडेविश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या निमित्ताने हे शहर सध्या ‘पोस्टरमय’ बनले आहे. विमानतळापासून सर्वत्र खेळाडूंची पोस्टर झळकत आहेत. स्पर्धेची ब्रॅण्डदूत आणि विश्व चॅम्पियन मेरी कोमसोबत एका स्थानिक मुलीचा फोटो या पोस्टरवर आहे. तिचे नाव अंकुशिता बोरो. येथून २०० किमी अंतरावर असलेल्या पर्वतीय भागातील दुर्गम खेड्यात राहणाºया या मुलीचा भारतीय संघापर्यंतचा प्रवास फारच रंजक आहे.लाईट वेल्टर (६४ किलो) गटात देशाचे प्रतिनिधित्व करणाºया अंकुशिताकडे ‘उद्याची मेरी कोम’ या नजरेतून पाहिले जाते. भारतीय बॉक्सिंग संघाचे सहायक कोच भास्कर भट्ट हे अंकुशिताचे फूटवर्क आणि शारीरिक उंचीमुळे तिच्याकडून मोठ्या आशा बाळगतात.आसाम-अरुणाचल सीमारेषेवर दिसपूर जिल्ह्यातील उलुबाडी हे अंकुशिताचे गाव. २०१४मध्ये याच ठिकाणी बोडो अतिरेक्यांनी ४० गावकºयांना ठार मारले होते. ती दहशत अद्याप कायम आहे. ८५ घरांच्या या गावाला भेट दिल्यानंतर ५०० लोकवस्तीच्या या गावात अंकुशिताने पदक जिंकावे, याबद्दल प्रचंड उत्सुकता दिसली. खेड्यात शेडवजा प्राथमिक शाळा आहे. अंकुशिताचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले. गावात फारशा सोयी नाहीत. वडील राकेश कुमार मानधन तत्त्वावर शिक्षक असून आई रंजिता आदिवासींसाठी महिला मंडळ चालविते. बोरो ही आसाममधील लढवय्यी जमात. काटक शरीरयष्टी लाभल्याने या जमातीमधून खेळात आणि सैन्यात जाणाºयांची संख्या मोठी आहे. अंकुशिताचा खेळासोबत १२वी आर्ट्सपर्यंतचा शैक्षणिक प्रवास गुवाहाटीत झाला.सन २०१२मध्ये गोलाघाट येथे साईने बॉक्सिंग चाचणी घेतली. तीत अंकुशिताची निवड झाली. पुढे गुवाहाटीच्या राज्य अकादमीत दोन वर्षे घाालविल्यानंतर तिच्या कामगिरीला नवी झळाळी लाभली.यंदा १७व्या वर्षांत पदार्पण करणाºया अंकुशिताने गेल्या दोन महिन्यांत तुर्कस्तान आणि बल्गेरियातील आंतरराष्टÑीय स्पर्धेत दोन रौप्यपदके जिंकली. स्वत:च्या मेहनतीच्या बळावर विमानप्रवास करणारी गावातील ती पहिली मुलगी असल्याचा सर्वांना अभिमान आहे.अंकुशिताने आज उपांत्यपूर्व फेरीचाअडथळा दूर करून देशासाठी पदकनिश्चित केले. तिची कामगिरी पाहण्यासाठी आई-वडील प्रेक्षागॅलरीत उपस्थित होते. मुलगी जिंकल्यानंतर दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.बालपणापासून हट्टी असलेल्या थोरल्या अंकुशिताने सुवर्ण जिंकावे आणि ती जिंकेलच, अशी दोघांचीही प्रतिक्रिया होती. ‘मला तीन मुली आहेत. तिन्ही मुली मुलासारख्याच असल्याचे’ सांगून मोठ्या अंकुशितासोबतच आठवीला असलेल्या धाकट्या मुलीला बॉक्सिंगमध्ये आणण्याचा निर्धार रंजिता यांनी व्यक्त केला.अंकुशिताची उपांत्य लढत पाहण्यासाठी ११० गावकरी स्टेडियमवर उपस्थित राहणार असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली.
पोस्टर गर्ल झाली मेडल विनर, बॉक्सर अंकुशिता बोरोचा प्रवास युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:13 AM