वॉशिंग्टन : ‘टोकियो आॅलिम्पिक स्थगित करणे अतिघाईचे ठरेल,’ असे मत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे (आयओए) अध्यक्ष थॉमस बाक यांनी म्हटले. कोरोनाच्या प्रकोपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विविध मतप्रवाहांवर विचार शक्य असल्याची कबुलीही बाक यांनी दिली.बाक म्हणाले, ‘जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश आणि आयओसीचे स्वत:चे कृतिदळ या दोन्ही संस्थांच्या सल्ल्यानुसार आम्ही काम करू.’ २४ जुलै ते ९ ऑगस्ट या निर्धारित कालावधीतच ऑलिम्पिकचे आयोजन पार पडेल, असा विश्वास व्यक्त करीत आधीच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ‘ऑलिम्पिक रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असेही बाक यांनी ठासून सांगितले.ते पुढे म्हणाले, ‘आम्ही वेगवेगळ्या मतप्रवाहांवर विचार करीत आहोत. तरीही ऑलिम्पिकला अद्याप साडेचार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. आॅलिम्पिक स्थगित करण्याचा आग्रह अतिघाईचा ठरेल. आमच्या कृतिदलाकडून अद्याप आम्हाला काहीही सूचना आलेली नाही.’ (वृत्तसंस्था)आरोग्य सर्वश्रेष्ठ असून आयओसी आर्थिक लाभासाठी कुठलाही विपरीत निर्णय घेणार नाही, याची खात्री बाळगा. कोरोनाची महामारी कधीपर्यंत कायम राहील, हे कुणी सांगू कशणार नाही, मात्र ऑलिम्पिक मशालीच्या प्रकाशात सर्व विश्व सुजलाम् सुफलाम् व्हावे, इतकी प्रार्थना नक्कीच करू शकतो. - थॉमस बाक
हिगाशीमत्सुशिमा : कोरोनामुळे आॅलिम्पिक आयोजनाबाबत कमालीची अनिश्चितता आहे. या सावटात आॅलिम्पिक मशाल शुक्रवारी जपानमध्ये दाखल झाली तेव्हा अत्यंत साधेपणाने स्वागत झाले. चार्टर्ड विमानाने मशालचे येथे आगमन झाले तेव्हा २०० शाळकरी मुलांना बोलविण्याचा सोहळा आयोजकांनी ऐनवेळी रद्द केला.माजी आॅलिम्पिक ज्युडो चॅम्पियन साओरी योशिदा आणि तदाहिरे नोसुरा यांनी पारंपरिक कुंडात काही अधिकाऱ्यांच्या साक्षीने मशाल प्रज्वलित केली. टोकियो २०२० आॅलिम्पिक प्रमुख योशिरो मोरी म्हणाले,‘मुलांना येथे उपस्थित राहायचे होते, मात्र कोरोनामुळे ऐनवेळी आम्ही गर्दी टाळण्याचा निर्णय घेतला. २६ मार्चपासून मशाल रिले सुरू होणार आहे. रिले मार्गात प्रेक्षकांनी गर्दी करू नये, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.