पोलंड : भारताची स्टार धावपटू हिमा दासनं कुटनो अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आठवडाभरात दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत असलेल्या हिमानं 23.97 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. व्ही के विस्मयाने ( 24.06 सेकंद) रौप्यपदक जिंकले. राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या मुहम्मद अनासनेही पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 21.18 सेंकदाच्या वेळेसह बाजी मारली.
आसामच्या या धावपटूनं मंगळवारी पोझनान स्पर्धेत 200 मीटर शर्यतीतच बाजी मारली होती. तिथे तिनं 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. विस्मयाला ( 23.75) येथे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. जागतिक कनिष्ठ गटातील विजेती आणि 400 मीटर शर्यतीतील राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या हिमानं पोलंड येथील स्पर्धेत वर्चस्व गाजवले.