प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय माजी क्रिकेटर आर. अश्विन आणि फुटबॉल दिग्गज आयएम विजयन यांच्यासह हरविंदर सिंग आणि सत्यपाल सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. पद्म पुरस्कारांच्या यादीतील पद्मभूषण पुरस्कार भारत सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांमधील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार असून पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल २०२५ पद्म पुरस्कारांच्या यादीत पाच वेगवेगळ्या खेळाडूंचा समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हॉकीतील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पीआर श्रीजेशच्या शिरेपेचात मानाचा तूरा
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक मिळवून देण्यात पीआर श्रीजेश याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेआधीच दिग्गज गोलकीपरनं निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो युवा भारतीय हॉकी संघासोबत कोचच्या रुपात काम करत आहे. हॉकी संघाची भिंत अशी ओळख असलेल्या श्रीजेशला देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असललेल्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारत सरकारने क्रिकेटपटू अश्विनच्या कामगिरीचीही घेतली दखल
भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल अश्विनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २०२४ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेदरम्यान भारताच्या दिग्गज फिरकीपटूनं अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आपल्या कारकिर्दीत १०६ कसोटी सामन्यात ५३७ विकेट्स घेतल्या आहेत. तो भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत इनिवलप्पिल मणि विजयन या दिग्गज फुटबॉलपटूच्या नावाचाही समावेश आहे. हा खेळाडू भारतातील सर्वकालीन महान फुटबॉलपटूंपैकी एक आहे. केरळच्या या माजी फुटबॉलपटूनं २०००-२००४ दरम्यान भारतीय संघाचे नेतृत्वही केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ७२ सामन्यांमध्ये भारतीय फुटबॉल संघाकडून त्यांनी २९ आंतरराष्ट्रीय गोल डागले आहेत. याशिवाय २०२४ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता हरविंदर सिंग याच्यासह कुस्तीच्या आखाड्यात मल्ल घडवण्याचा वसा घेतलेले राष्ट्रीय चॅम्पियन आणि माजी कुस्तीपटू आणि कोच सतपाल सिंग यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्म पुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी
- पीआर श्रीजेश- पद्मभूषण
- आर. अश्विन - पद्मश्री
- आयएम विजयन- पद्मश्री
- सत्यपाल सिंग - पद्मश्री
- हरविंदर सिंग-पद्मश्री