- ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 16 - रिओ ऑलिम्पिकमध्ये दिपा कर्माकरला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आपल्या देशात ज्या खेळासाठी काहीच सुविधा उपलब्ध नाहीत त्या खेळात इतक्या दूरपर्यंत पोहोचल्याबद्दल तिचं कौतुक होत आहे. मात्र दुसरीकडे आपल्या देशाला अजूनपर्यत एकही पदक किंवा सुवर्णपदक का मिळालं नाही ? असा सवालही विचारला जात आहे. याचं उत्तर कदाचित झारखंडमध्ये ऑलिम्पिक 2020 साठी सराव करणारे हे खेळाडू देऊ शकतील.
राज्यस्तरीय स्विमर 16 वर्षीय रेखा कुमारी आणि जवळच्या गावातील काही स्विमर रोज सकाळी रांचीबाहेरील धरणाभोवती जमतात. आश्चर्य वाटेल पण हे सर्व खेळाडू सराव करण्यासाठी जमतात. इतर काहीच सोय नसल्याने त्यांना चक्क धरणात पोहण्याचा सराव करावा लागत आहे. या धरणात पोहणे धोकादायक आहे, कारण धरण भरुन वाहत असल्याने पावसाळ्यात धोका वाढतो. मात्र पर्याय नसल्याने जीव धोक्यात घालून हा सराव करावा लागत आहे.
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया या मुलांना ट्रेनिंग देत आहे. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया देशभरातून चांगल्या खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. पण त्यांच्याकडे स्विमिंग पूलची सुविधा नाही. उमेश कुमार या मुलांना प्रशिक्षण देत आहेत. 'सरकारने या मुलांसाठी काहीतरी करावं', अशी आशा उमेश कुमार यांनी व्यक्त केली आहे.
2012 मध्ये रांची कॉम्प्लेक्सचं उद्धाटन करण्यात आलं होतं. येथे स्विमिंगसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे हे ठिकाण धरणापासून जवळच आहे. मात्र हे कॉम्प्लेक्स दोन महिन्यातच काही कारण न देता बंद करण्यात आलं. सरकारला झारखंड स्विमिंग असोसिएशने वारंवार पत्र लिहिली मात्र काहीच उत्तर आलेलं नाही.