ग्रेटर नोएडा : डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा याला क्षेत्ररक्षणादरम्यान चेंडू डोक्याला लागल्याने इस्पितळात हलविण्यात आले. इंडिया ब्ल्यू आणि इंडिया ग्रीन यांच्यात येथे खेळल्या जात असलेल्या दुलीप करंडक लढतीदरम्यान बुधवारी ही घटना घडली. इंडिया ब्ल्यूच्या दुसऱ्या डावात ६३ व्या षटकात ही घटना घडली. इंडिया ग्रीन संघाचा खेळाडू असलेला ओझा मिडॉनवर क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. श्रेयस गोपालच्या चेंडूवर पंकजसिंग याने मारलेला फटका रोखण्याच्या नादात ओझा खाली वाकला. त्याचवेळी चेंडू अचानक उसळला आणि त्याच्या डोक्यावर आदळताच ओझा चक्क खाली कोसळला. त्याला मैदानाबाहेर हलविण्यासाठी स्ट्रेचर बोलवावे लागले. नंतर तपासणीसाठी त्याला नजीकच्या इस्पितळात हलविण्यात आले. घटनेसंदर्भात बीसीसीआयने टिष्ट्वट केले. त्यात दुलीप करंडक सामन्यादरम्यान प्रग्यानला डोक्यावर जखम झाल्याचे सांगण्यात आले. पहिल्या डावात गडी बाद करण्यात अपयशी ठरलेल्या प्रग्यानने इंडिया ब्ल्यूच्या दुसऱ्या डावात तीन गडी बाद केले. इंडिया ब्ल्यूने दुसऱ्या डावात २८८ धावांची नोंद करीत इंडिया ग्रीनपुढे चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी ७६९ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले होते. इंडिया ब्ल्यूने पहिल्या डावात ७०७ धावा केल्यानंतर इंडिया ग्रीनला केवळ २३७ धावांत गुंडाळले होते. (वृत्तसंस्था)ओझा शुद्धीवर!इस्पितळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रग्यान ओझा शुद्धीवर आला आहे. त्याला इस्पितळात काही काळ ठेवण्यात येईल. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती कोच व्ही. रमण यांनी दिली आहे.
डोक्याला चेंडू लागल्याने प्रग्यान ओझा जखमी
By admin | Published: September 08, 2016 4:16 AM