ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 11 - बांगलादेशविरोधात 204 धावांची जबरदस्त खेळी करणा-या कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रिकेटचा देव मानला जाणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराट कोहलीच्या आपल्या विशेष शैलीत कौतुक केलं आहे. विराट कोहलीच्या प्रदर्शनात असलेल्या सातत्यांच सचिनने भरभरुन कौतुक केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून सचिनने आपल्या भावना व्यक्त करत विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
'तुझ्या बॅटवर असलेला स्वीट स्पॉट तू किती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे हे सांगतं. त्यासाठी स्कोअरबोर्डची गरज नाही. देव करो तुझी बॅट नेहमी अशीच राहो', असं ट्विट सचिन तेंडुलकरने केलं आहे. सचिन तेंडुलकरच्या या गोड आणि आत्मविश्वास वाढवणा-या ट्विटमुळे विराट कोहली नक्कीच आनंदित झाला असेल.
विराट कोहली 54 वा कसोटी सामना खेळत आहे. यादरम्यान त्याने 16 शतकं आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने 4413 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या करिअरकडे पाहायचं गेल्यास या पायरीवर त्याने 49.82च्या सरासरीने 3438 धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने 54 कसोटी सामन्यांमध्ये 11 शतकं आणि 16 अर्धशतकं केली होती.
The sweet spot on your bat speaks about the awesome form you are in, don't need scoreboards.May god always keep your bat like that @imVkohlipic.twitter.com/zSgLgTeTYY— sachin tendulkar (@sachin_rt) February 11, 2017
बांगलादेशविरोधात दुस-या दिवशी खेळताना विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील चौथं द्विशतक साजरं केलं. ही सलग चौथी मालिका आहे ज्यामध्ये विराट कोहलीने द्विशतक केलं. याअगोदर सर डॉन ब्रॅडमॅऩ आणि राहुल द्रविड यांनी सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम केला होता. भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सहा द्विशतक केली आहेत. तर राहुल द्रविडने पाच वेळा द्विशतक केलं आहे.
विराट कोहलीने अजून एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने मायदेशात एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने 15 डावांत 1116 धावा केल्या आहेत. यासोबतच विराट कोहलीने विरेंद्र सेहवागचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विरेंद्र सेहवागने 2004-05 मध्ये 17 डावांत 69.06 च्या सरासरीने 1105 धावा केल्या होत्या.