Prakash Padukone :पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान संपले आहे. सोमवारी शटलर लक्ष्य सेनला कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली झी जियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अशातच भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी पॅरिसमधील खराब कामगिरीनंतर भारतीय बॅडमिंटनपटूंवर निशाणा साधत टीका केली आहे. भारतात खेळाडूंना भरपूर सुविधा असून आता खेळाडूंनी पुढे जाण्याची आणि जिंकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात प्रकाश पदुकोण यांनी रोष व्यक्त केला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना खास कामगिरी करता आलेली नाही. १० दिवसांनंतरही भारताच्या खात्यात फक्त तीन कांस्यपदके आहेत, जी नेमबाजीत आली आहेत. भारताला सोमवारी बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनकडून पदकाची अपेक्षा होती मात्र त्यालाही पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या पी. व्ही. सिधूंलाही फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशातच भारतीय बॅडमिंटनपटूंना प्रकाश पदुकोण यांनी सुनावले आहे. प्रकाश पदुकोण यांनी पॅरिसमधील देशातील खेळाडूंच्या फ्लॉप शोवर जोरदार टीका केली आहे. अमेरिकन खेळाडूंनाही ज्या सुविधा मिळत नाही त्या भारतीय खेळाडूंना मिळत असल्याचे प्रकाश पदुकोण म्हणाले.
“आता खेळाडूंनी जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. सध्याचे ऑलिम्पिक आणि मागील ऑलिम्पिक पाहिल्यास, आपण सरकार आणि महासंघाला जबाबदार धरू शकत नाही. त्यांना जे काही करता आले, ते त्यांनी केले. ते फक्त सुविधा देऊ शकतात. पण शेवटी खेळाडूंना कामगिरी करावी लागेल. हे खेळाडू त्याच खेळाडूंना इतर स्पर्धांमध्ये पराभूत करतात पण ऑलिम्पिकमध्ये ते करू शकत नाहीत. खेळाडूंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खेळाडू पुरेशी मेहनत घेत आहेत का, याचा विचार करायला हवा. त्या दिशेने काम करण्याची गरज आहे," असे प्रकाश पदुकोण म्हणाले.
“प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा फिजिओ, कंडिशनिंग ट्रेनर, न्यूट्रिशनिस्ट असतो. अजून किती करायला हवं? अमेरिकेसह इतर देशांमध्ये अशा सुविधा उपलब्ध आहेत असे मला वाटत नाही. मला आशा आहे की खेळाडूंना याची जाणीव होईल की ते जबाबदारी घेतील. त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल नाहीतर महासंघाला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. मात्र, अनेक स्टार खेळाडू असल्याने ते सोपे होणार नाही. त्यांना काही गोष्टी मिळाल्या नाहीत तर तो मुद्दा बनतो. चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंमुळे मी खूश नाही. तो (लक्ष्य सेन) पदक जिंकू शकला असता पण इतक्या जवळ आल्यानंतरही तो विजयापासून हुकला," असेही प्रकाश पदुकोण म्हणाले.
दरम्यान, लक्ष्याशिवाय अनेक भारतीय खेळाडूंनी पेरिल ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावले. लक्ष्य सेनला कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली जी जियाविरुद्ध १-१३, १६-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला.