बँकॉक : आॅलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल व बी. साई प्रणित यांनी शुक्रवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत थायलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या दुसऱ्या मानांकित सायनाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या हारुको सुजुकीचा २१-१५, २०-२२, २१-११ ने पराभव करीत अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळवले. सायनाला उपांत्य फेरीत बुसानन ओंगबामरुंगफाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय बॅडमिंटनपटू बी. साई प्रणितने शुक्रवारी स्थानिक खेळाडू कांताफोन वांगचारोएनचा सरळ गेम्समध्ये पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित प्रणितने पुरुष एकेरीत थायलंडच्या खेळाडूचा २१-१६, २१-१७ ने सहज पराभव केला. जागतिक क्रमवारीत २४ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूने विश्व क्रमवारीत १०२ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा ५० मिनिटांमध्ये पराभव केला. या लढतीपूर्वीही प्रणितची वांगचारोएनविरुद्ध लढत झाली आहे. त्यातही प्रणितने सरशी साधली होती. गेल्या वर्षी इंडोनेशिया मास्टर्समध्ये प्रणितने त्याचा १८-२१, २१-१४, २१-१५ ने पराभव केला होता. सिंगापूर ओपन चॅम्पियन प्रणितने गुरुवारी उपउपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या सिकंदर जुल्करनैनचा सहज पराभव केला होता. (वृत्तसंस्था)
प्रणित, सायनाची आगेकूच
By admin | Published: June 03, 2017 12:47 AM