सिंगापूर : उदयोन्मुख भारतीय बॅडमिंटनपटू बी. साई प्रणीतने रविवारी सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत मायदेशातील सहकारी किदाम्बी श्रीकांतचा पराभव करीत कारकिर्दीत प्रथमच सुपर सिरीज स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या प्रणीतने श्रीकांतचा ५४ मिनिटांमध्ये १७-२१, २१-१७, २१-१२ ने पराभव केला. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनच्या इतिहासात प्रथम दोन भारतीय खेळाडूंदरम्यान सुपर सिरीजची अंतिम लढत रंगली. ही लढत चुरशीची झाली. गोपीचंद अकादमीमध्ये नियमित सराव करणाऱ्या या दोन खेळाडूंना एकमेकांच्या खेळाची चांगली माहिती होती. उभय खेळाडू एकमेकांविरुद्ध सरशी साधण्यास प्रयत्नशील होते. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने अचूक स्मॅशच्या जोरावर गुण वसूल केले. त्याने प्रणीतच्या फोरहँड शॉटवर शानदार रिटर्नच्या आधारावरही वर्चस्व गाजवले. प्रणीतने त्यानंतर संघर्षपूर्ण खेळ करीत १४-१५ अशी पिछाडी भरून काढली, पण श्रीकांतने वर्चस्व कायम राखताना पहिला गेम जिंकत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने सुरुवातीला ४-१ अशी आघाडी घेतली होती, पण प्रणीतने पुनरागमन करीत ७-७ अशी बरोबरी साधली. प्रणीतने त्यानंतर ११-१० अशी आघाडी मिळवली. प्रणीत वर्चस्व गाजवत असताना श्रीकांतने सर्व्हिसमध्ये चूक केली. त्यामुळे प्रणीतने २०-१७ अशी आघाडी घेतली. श्रीकांतने एक चुकीचा फटका खेळल्यामुळे प्रणीतने लढतीत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये प्रणीतने लय कायम राखताना सुरुवातीला ७-३ अशी व ब्रेकपर्यंत ११-५ अशी दमदार आघाडी घेतली होती. प्रणीतने वर्चस्व कायम राखताना १९-१२ अशी आघाडी घेतली होती. श्रीकांतने चुकीचा फटका खेळल्यामुळे प्रणीतला मॅच पॉर्इंट मिळाला. श्रीकांतने पुन्हा एक चूक केल्यामुळे प्रणीतच्या पहिला सुपर सिरीज विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. २०१० मध्ये विश्व ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावल्यानंतर प्रणीतने काही दिग्गज बॅडमिंटनपटूंचा पराभव केला होता. त्यात मलेशियाचा माजी आॅल इंग्लंड चॅम्पियन मोहम्मद हफीज हाशिम, माजी आॅलिम्पिक व विश्वचॅम्पियन तौफिक हिदायत आणि जागतिक क्रमवारीतील नंबर वन ली चोंग वेई यांचा समावेश आहे. यापूर्वी प्रणीतला दुखापतीमुळे सुपर सिरीजच्या सुरुवातीच्या फेरीमध्येच गाशा गुंडाळावा लागला होता, पण गेल्या वर्षी कॅनडामध्ये जेतेपद पटकावल्यानंतर परिस्थितीमध्ये बदल झाला. गेल्या वर्षी कॅनडा ओपन ग्रांप्री व यंदा सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धा जिंकणाऱ्या विजेतेपदानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘ज्या खेळाडूविरुद्ध रोज खेळतो त्याच्याविरुद्ध खेळणे नेहमीच कठीण असते. आजच्या विजयामुळे खूश आहे. स्पर्धेतील कामगिरीबाबत समाधानी आहे. येथे भारतीय खेळाडूंना चांगला पाठिंबा मिळाला.’’
प्रणीतचे पहिलेच सुपर सिरीज विजेतेपद
By admin | Published: April 17, 2017 1:21 AM