सिडनी : भारताच्या एच.एस. प्रणाॅय याला रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत त्याला चीनच्या वेंग होंग यांग याच्याविरुद्ध तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. केरळच्या ३१ वर्षीय प्रणाॅयने पहिली गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले. मात्र, निर्णायक गेममध्ये त्याला पाच गुणांच्या आघाडीचा फायदा घेता आला
नाही आणि जगातील २४ व्या क्रमांकावरील खेळाडू वेंग याच्याकडून ९-२१, २३-२१, २०-२२ असा पराभव झाला. कोरिया ओपन (२०२२) आणि चीन ओपनचे (२०१९) विजेतेपद पटकावणाऱ्या यांगने या विजयासह मलेशियन मास्टर्सच्या अंतिम लढतीत प्रणाॅयविरुद्धच्या पराभवाचा हिशेब चुकता केला. या दोन्ही खेळाडूंमध्ये याआधी केवळ एक सामना झाला होता. प्रणयने त्या सामन्यात तीन गेममध्ये विजय मिळवत मलेशियम मास्टर्सचे विजेतेपद पटकावले होते. प्रणाॅयने या सत्रात आठपैकी सहा सामने सुरुवातीच्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही जिंकले आहेत. त्याने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील अँथोनी गिंटिंग याच्याविरुद्ध पहिली गेम गमावल्यानंतरही विजय मिळवला होता. पहिली गेम गमावल्यानंतर प्रणयकडे निर्णायक गेममध्ये पाच गुणांची १९-१४ अशी आघाडी होती. मात्र, वेंगने शानदार कामगिरी करत विजय साकारला.
n प्रणाॅयने सामन्यात शानदार सुरुवात करताना ६-६ अशी बरोबरी साधली. त्यानंतर वेंगने दबदबा निर्माण करताना १२ गुण मिळवले. प्रणाॅयने चुकीचा फटका मारत पहिली गेम गमावली. दुसऱ्या गेममध्येही तो ०-३ असा पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने ११-८ अशी आघाडी घेतली. n वेंगने येथून पुनरागमन करत १९-१९ अशी बरोबरी साधली. त्यानंतर वेंगने वैद्यकीय विश्रांती घेतल्यानंतर २१-२१ अशी बरोबरी साधली. प्रणाॅयने सलग दोन गुण घेत दुसरी गेम जिंकली. तिसऱ्या गेममध्ये प्रणाॅय १५-९ अशा आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर १९-१९ अशी बरोबरी झाली. प्रणाॅयने विजेतेपदाची संधी निर्माण केली होती. मात्र, वेंगने सलग गुण घेत विजय मिळवला.