मुंबई : देशातील सर्वात बलाढ्य राज्य संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रशरीरसौष्ठव संघटनेची ताकद आता आणखी वाढली आहे. राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांच्यावर आता दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा पॉल चुआ यांनी प्रशांत आपटे यांच्या निवडीची नुकतीच घोषणा करून महाराष्ट्र शरीरसौष्ठवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
"आपल्या कार्यकालात दक्षिण आशियातील शरीरसौष्ठवाला आलेली मरगळ दूर करून पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचे आपले पहिले प्रयत्न असल्याचे आपटे म्हणाले. पॉल चुआ यांनी दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन," असा विश्वासही आपटे यांनी अध्यक्षपदाची सुत्रं स्वीकारताना व्यक्त केला. पुन्हा दिसणार 'दक्षिण आशियाई-श्री'चा थरारगेले काही वर्षे थंडावलेल्या 'दक्षिण आशियाई-श्री' स्पर्धेला पुन्हा एकदा चालना देण्याचे काम नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत आपटे करणार आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारताच येत्या एप्रिल-मे 2019 दरम्यान नेपाळमध्ये 'दक्षिण आशियाई-श्री' स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केले. ते आतापासूनच या स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीला लागले आहेत. या स्पर्धेत दक्षिण आशियातील भारतासह, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव हे देशही सहभागी होणार आहेत. नेपाळपाठोपाठ 2020सालच्या दक्षिण आशियाई स्पर्धेचे यजमानपद मालदीवला देण्यात आल्याची माहिती आपटे यांनी याप्रसंगी दिली.