- भ. के. गव्हाणे, बार्शी
जिद्द, चिकाटी व प्रयत्न यांच्या जोरावर टेनिस खेळात नवीन विक्रमी नोंद करत आल्यामुळे आंतरराष्ट्रीय कीर्तीची सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातील प्रार्थना गुलाबराव ठोंबरे हिची निवड रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर गुरूवारी आय.टी.एफ.च्या वतीने फ्रान्समधील मॉन्टपेलीयर येथे सुरू असलेल्या २५ हजार डॉलर्स या खुल्या महिलांच्या दुहेरी टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश झाल्याने ही प्रार्थनाच्या आजच्या वाढदिवसाची भेट म्हणावी लागेल.फ्रान्स येथील उपांत्य फेरीत प्रार्थना व जोडीदार नेदरलँडची वकॅनो यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या फ्रान्सच्या खेळाडू ककॅरेविक व पॅरताऊड या दोघींचा ६-३ व ६-२ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील टेनिसपटू प्रार्थना आज जागतिक मानांकनातील १९० व्या क्रमांकावर पोहोचली तर जगातील टॉपमधील असलेल्या २०० खेळाडूत समावेश झाला आहे.प्रार्थनाने गेल्या चार महिन्यात मुंबई, पुणे, दिल्ली व इंडोनेशियातील स्पर्धेत खेळली. शिवाय द.कोरिया इंचियोनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचाच नव्हे तर देशाचाही नावलौकिक केला आहे. तिची स्पेन येथील व्हॅलेन्सिया येथील व्हॅल अकॅडमी प्रशिक्षणासाठी भारताकडून निवड झाली होती. यावेळी तिला जागतिक पहिल्या दहा अव्वल खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली होती.जगाच्या नकाशावर बार्शीचे नाव नेणाऱ्या प्रार्थनाने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना बक्षिसांची लयलूट केली तर २००९ मध्ये एशियन लॉन टेनिस स्पर्धेत १७ वर्षांखालील गटाचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. वयाच्या आठव्या वर्षापासून तिचे आजोबा आप्पासाहेब झाडबुके यांच्यासोबत कोर्टवर येत होती. ते मार्गदर्शक असल्याने त्यांचा प्रभाव पडला. यशाचा आलेख वाढत जाऊन तिच्याकडे जगाचे लक्ष लागले होते.