मुंबई : यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या पूर्व विभागाने अखेरपर्यंत आपला धडाका कायम राखताना निर्णायक सामन्यात बलाढ्य पश्चिम विभागाचा ८ विकेटने पराभव करुन सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, राउंड रोबिन पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत पूर्व विभागाने एकही पराभव न स्वीकारता दिमाखात विजेतेपदावर कब्जा केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पश्चिम विभागाला निर्धारित २० षटकांत ५ बाद १४९ धावांवर रोखल्यानंतर पूर्व विभागाने आक्रमक फटकेबाजी करताना १३.४ षटकांतच केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात बाजी मारली. सलामीवीर विराट सिंगने ३४ चेंडंूत ५ चौकार व ३ षटकार ठोकताना नाबाद ५८ धावांची विजयी खेळी केली. त्याला उपयुक्त साथ देणाऱ्या इशांक जग्गीने ३० चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी करुन ५६ धावा चोपल्या. या दोघांनी ४४ चेंडंूत ८० धावांची भागीदारी करुन पूर्व विभागाचे जेतेपद निश्चित केले. शार्दूल ठाकूरने पूर्व विभागाचे दोन्ही बळी घेत थोडाफार प्रतिकार केला. तत्पूर्वी, शेल्डॉन जॅक्सनच्या (४४ चेंडूंत ५२) अर्धशतकानंतरही पश्चिम विभागाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. कर्णधार पार्थिव पटेल (१७), आदित्य तरे (१), दीपक हुडा (१९) आणि प्रेरक मंकड (२०) अपयशी ठरले. रुजुल भटने (२० चेंडूंत ३६) काहीसा आक्रमक पवित्रा घेतल्यान पश्चिम विभागाला समाधानकार मजल मारता आली. प्रितम दासने २, तर सूर्यकांत प्रधान, सयन घोष आणि प्रग्यान ओझा यांनी प्रत्येकी एक बळी घेत पश्चिम विभागाला जखडवून ठेवले. (क्रीडा प्रतिनिधी) संक्षिप्त धावफलक पश्चिम विभाग : २० षटकांत ५ बाद १४९ धावा (शेल्डॉन जॅक्सन ५२, रुजुल भट नाबाद ३६; प्रितम दास २/२५) पराभूत वि. पूर्व विभाग : १३.४ षटकांत २ बाद १५३ धावा (विराट सिंग नाबाद ५८, इशांक जग्गी ५६; शार्दूल ठाकूर २/३१)
पूर्व विभागाचे दिमाखदार विजेतेपद
By admin | Published: February 19, 2017 1:54 AM