पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रीती पाल हिने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. महिला १०० मीटर शर्यतीत (T35) तिसऱ्या स्थानावर राहत तिने खास कामगिरीचीही नोंद केली आहे. दीपा मलिक हिच्यानंतर मैदानी क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे.
नेमबाजीत अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई करत भारताचे पदकाचे खाते उघडले होते. त्यानंतर मैदानी क्रीडा प्रकारात प्रीतीनं पदकाला गवसणी घातली.
२३ वर्षीय प्रीतीनं महिला गटातील (T35) प्रकारातील शर्यतीत १४.२१ सेककंदासह पर्सनल बेस्ट टायमिंग नोंदवत पदक निश्चित केले. चीनच्या झोउ जिया हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. तिने १३.५८ सेकंदात १०० मीटर अंतर कापले. चीनच्या गुओ कियानकियान हिने १३.७४ सेकंदासह रौप्यवर कब्जा केला.
प्रीतीसाठी हे वर्ष एकदम खास राहिले आहे. मार्च २०२४ मध्ये बंगळुरु येथे झालेल्या सहाव्या भारतीय ओपन पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. याशिवाय जपानमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेतही तिसरे स्थान पटकावले होते. याच कामगिरीच्या जोरावर तिने पॅरिस पॅरालिम्पिकचा कोटा मिळवला होता. आता इथं पदक जिंकून तिने नवा इतिहास रचला आहे.