ब्रासिलिया : जगभरात झिका विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्रपती डिल्मा रोसैफ यांच्या कार्यालयाने यंदा ब्राझीलमध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक खेळासाठी गरोदर महिलांनी येथील दौरा करू नये, असा सल्ला दिला आहे. डासांमुळे मानवात होणाऱ्या या संक्रमणाच्या कचाट्यात आतापर्यंत अमेरिकन खंडातील २० पेक्षा अधिक देश सापडले आहेत. याचा सर्वाधिक प्रभाव ब्राझीलमध्ये दिसून आला. येथे या विषाणूची लागण झाल्याचे जवळजवळ चार हजार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. राष्ट्रपतीचे कॅबिनेट प्रमुख जॅक्स वेगनर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे, की आॅलिम्पिकदरम्यान याचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना होण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका ओळखून गरोदर महिलांनी येथील दौरा करू नये, असा त्यांना सल्ला देण्यात येत आहे. रिओ आॅलिम्पिकला प्रारंभ होण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक असताना ही सूचना देण्यात आलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) झिका विषाणूबाबत आणीबाणी जाहीर केल्यानंतर रिओ आॅलिम्पिक आयोजक आणि ब्राझील सरकारनेही ही सूचना दिली आहे. वेगनर म्हणाले, की डासांमुळे होणाऱ्या या आजाराचा सर्वाधिक प्रभाव बालकांच्या शारीरिक विकासावर होतो. डब्ल्यूएचओने आणीबाणी जाहीर केल्यानंतर जगभरातील नागरिकांना याच्यापासून असलेल्या धोक्याची कल्पना येईल. हे सकारात्मक पाऊल आहे. आॅलिम्पिकसाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये गरोदर महिलांचा समावेश राहणार नाही, अशी आम्हाला आशा आहे. या व्यतिरिक्त पुरुष, महिला किंवा प्रौढांना याचा प्रादुर्भाव झाला, तर पाच दिवसांमध्ये त्यांच्यावर उपचार शक्य आहे. जर तुम्ही गरोदर महिला नसाल, तर येथे येण्यास कुठली अडचण नाही.सरकारने याचा धोका ओळखला आहे. सध्या ब्राझील सरकारपुढे असलेल्या अडचणींमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे ही सर्वांत मोठी अडचण आहे, असेही वेगनर म्हणाले.(वृत्तसंस्था)
गरोदर महिलांनी आॅलिम्पिकपासून दूर राहावे
By admin | Published: February 03, 2016 3:13 AM