मेलबोर्न : महिनाभरानंतर सुरू होत असलेल्या विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेला भारतीय संघ रविवारी तिरंगी मालिकेतील आपल्या पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून विश्वकप स्पर्धेची तयारी योग्य दिशेन सुरू असल्याचे सिद्ध करण्यास उत्सुक आहे.तिरंगी मालिकेत भारतीय संघ प्रयोग करू शकतो; पण विश्वकप स्पर्धेपूर्वी संघाचा समतोल साधला गेला, तर आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत आॅस्ट्रेलियाविरुद्ध २-० ने पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरीची आशा आहे. मेलबोर्न क्रिकेट मैदानावर जवळजवळ दोन आठवड्यांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच मैदानावर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. धोनीला सर्वप्रथम सलामीच्या जोडीबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल. भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत आपल्या मोहिमेचा प्रारंभ पाकिस्तानविरुद्ध अॅडिलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीने करणार आहे; पण त्याआधी सलामीच्या जोडीबाबत ठोस निर्णय न होणे चिंतेचा विषय आहे. रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी संघव्यवस्थापनाला शिखर धवनसोबत सलामीला अजिंक्य रहाणे की रोहित शर्मा डावाची सुरुवात करणार, याबाबत निर्णय घेता आलेला नाही. सलामीच्या जोडीचा निर्णय न झाल्यामुळे उर्वरित फलंदाजी क्रमावरही प्रभाव पडेल. जर रहाणे धवनसोबत डावाची सुरुवात करणार असेल, तर रोहित कुठल्या क्रमांकावर फलंदाजीला येईल? जर रोहित डावाची सुरुवात करणार असेल, तर रहाणेला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठविले जाण्याची शक्यता आहे. चौथ्या स्थानावर रहाणेला विशेष छाप पाडता आलेली नाही.विराटला त्याच्या पसंतीच्या तिसऱ्या स्थानावरून बढती देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रयोग श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या मालिकेत केला गेला आहे. संघाच्या सराव सत्रादरम्यान याबाबत स्थिती स्पष्ट झालेली नाही. त्या वेळी अंबाती रायडू व स्टुअर्ट बिन्नी यांच्यासह विशेष क्रमांकावर फलंदाजी करण्याबाबत आग्रह नसलेल्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. रायडू व बिन्नी या स्पर्धेत चकमदार कामगिरी करून विश्वकप स्पर्धेसाठी अंतिम संघातील स्थान निश्चित करण्यास उत्सुक आहेत. रविवारच्या लढतीत आर. आश्विन व अक्षर पटेल अंतिम संघात खेळणार असल्याचे जवळजवळ निश्चित आहे. रवींद्र जडेजा अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही, तर गुडघ्याच्या दुखापतीमुळे ईशांत शर्माला संघ व्यवस्थापन अंतिम संघात स्थान देण्याची जोखीम पत्करणार नाही. सिडनी कसोटीत विशेष छाप सोडण्यात अपयशी ठरलेल्या भुवनेश्वरला संघात स्थान मिळते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)निवृत्तीच्या निर्णयावर धोनीची चुप्पी, सर्व लक्ष तिरंगी मालिकेवर केंद्रितकसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याच्या आश्चर्यचकित करणाऱ्या निर्णयावर चुप्पी साधणारा भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी शनिवारी तिरंगी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा समतोल साधण्यासाठी ही तिरंगी मालिका उपयुक्त ठरणार असल्याचे धोनी म्हणाला. धोनीने कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना मेलबोर्न मैदानावर खेळला होता आणि याच मैदानावर वन-डेमध्ये तो संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बीसीसीआयने प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकामध्ये माझ्या निवृत्तीबाबत सर्व काही स्पष्ट करण्यात आले. तुम्ही प्रश्न विचारू शकता; पण कुठल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, हा माझा निर्णय आहे.नव्या नियमांमुळे विश्वकप स्पर्धा रोमांचक होईल : द्रविडनवी दिल्ली : पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या विश्वकप स्पर्धेत रंगतदार लढती होण्याची शक्यता असून, वन-डेच्या बदललेल्या नियमांमुळे कामचलाऊ गोलंदाजांच्या तुलनेत नियमित गोलंदाजांना अधिक महत्त्व द्यावे लागेल, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले. १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असलेल्या विश्वकप स्पर्धेत संघांना व्यूहरचना ठरविताना नव्या नियमांचा प्रभाव दिसेल, असेही द्रविड म्हणाला. दरम्यान, नव्या नियमानुसार वन-डे सामन्यांत एका डावात ३० यार्डमध्ये प्रत्येक वेळी पाच क्षेत्ररक्षक ठेवणे अनिवार्य आहे. संथ खेळपट्टीबाबत चिंता नाही : फॉकनरसंथ खेळपट्टीबाबत चिंता नाही. भारतीय संघाला याचा लाभ मिळणार असेल, तर यजमान संघही त्याचा लाभ घेण्यास सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू जेम्स फॉकनरने व्यक्त केली. कसोटी मालिकेमध्ये मेलबोर्न व सिडनीमध्ये पाटा खेळपट्टीचा भारतीय संघाला लाभ मिळाला, अशी टीका झाली होती. यामधून अंतिम संघ निवडला जाईलभारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), आऱ आश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अम्बाती रायडू, ईशांत शर्मा, मोहित शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव़ आॅस्ट्रेलिया - जॉर्ज बेली (कर्णधार), मायकल क्लार्क, पॅन कमिन्स, झेविअर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अॅरोन फिंच, ब्रॅड हॅडिन, जोस हेजलवुड, मिशेल जॉन्सन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्हन स्मिथ, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसऩ