नवी दिल्ली : सलग दोन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचलेला पैलवान सुशीलकुमार आगामी आॅलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून देण्याच्या लक्ष्यासह तयारी करीत आहे.सुशीलचे गुरू महाबली सत्पाल यांनी त्यांच्या शिष्याच्या तयारीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सुशील पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याची तयारी जोरात सुरू आहे. ज्याप्रमाणे आॅलिम्पिकमध्ये कुस्तीच्या लढती खेळल्या जातात, त्यानुसारच आम्ही सुशीलकडून तयारी करून घेत आहोत.’’द्रोणाचार्य पुरस्कारविजेते सत्पाल म्हणाले, ‘‘सुशीलमध्ये जबरदस्त जिद्द आहे. तो आॅलिम्पिकविषयी खूप गंभीर आहे आणि त्याचे एकच लक्ष्य म्हणजे या वेळी सुवर्णपदक जिंकणे, हे आहे. यशासाठी खेळाडूंमध्ये जसा आत्मविश्वास आवश्यक असतो, तसाच सुशीलमध्ये दिसत आहे.’’सुशीलने २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि २०१२च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक प्राप्त केले होते. सत्पाल म्हणाले, ‘‘आम्ही छत्रसाल स्टेडियम आखाड्यात सुशीलकडून तीन सत्रांत सराव करून घेत आहोत. कारण, आॅलिम्पिकमध्ये कुस्तीच्या लढती एका दिवसातच खेळल्या जातात. सुशील सकाळी थोडा व्यायाम करतो आणि पुढील सत्र ११ वाजता असते व अखेरचे सत्र सायंकाळी असते. तो त्याच्यापेक्षा जास्त वजनगटाच्या पैलवानांसोबत सराव करतो.’’(वृत्तसंस्था)
सुशील सुवर्णपदकाची तयारी करतोय
By admin | Published: February 19, 2016 2:50 AM