कोरोना व्हायरसनं अवघ्या जगाला वेठीस धरलं आहे. या व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी जग लढा देत आहे. कोरोनामुळे असे अभूतपूर्व संकट येईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण, हे संकट भारतासाठी एक संदेश आणि संधी घेऊन आले आहे. सर्व नियमांचे पालन करुन बचाव करण्यासह आम्हांला पुढेही जायचे आहे, असा संदेश देत पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची विशेष आर्थिक योजना घोषित केली. तसेच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे नियम आणि नवीन स्वरुप असल्याचे संकेत दिले. मोदींची ही घोषणा म्हणजे अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रकुल पदकविजेती कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगाटनं दिली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाल दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशषे आर्थिक योजने स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. या पॅकेजची विस्तृत माहिती वित्तमंत्री निर्मला सीतारामण येत्या काही दिवसांत देतील.''