ऑनलाइन लोकमत राजकोट, दि. ५ - भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाला विवाहापूर्वीच त्याच्या सासरकडच्या मंडळींनी ९७ लाखांची आलिशान ऑडी क्यू ७ गाडी भेट दिली आहे. रविंद्र जा़डेजाचे १७ एप्रिलला रिवाबा सोलंकी या तरुणीबरोबर विवाह होणार आहे. पाच फेब्रुवारीला एका शानदार सोहळयात रविंद्र आणि रिवाबाचा साखरपुडा झाला. रिवाबा मॅकेनिकल इंजिनियर असून, तिला नोकरी करायची आहे. सोमवारी रविंद्र आणि रिवाबाने स्थानिक शो रुमधून आलिशान ऑडी क्यू ७ गाडीचा ताबा घेतला.रिवाबा हरदेवसिन सोलंकी यांची एकुलती एक मुलगी आहे. हरदेवसिन राजकोटमध्ये दोन खासगी शाळा चालवतात त्याशिवाय त्यांचा व्यवसाय आहे. सोलंकी कुटुंब जुनागढमधील बालागाम गावचे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जाडेजाचा लग्न सोहळा तीन दिवस चालणार आहे. विवाहाच्या आदल्यादिवशी १६ एप्रिलला जाडेजाने आपल्या मित्रांसाठी पार्टी आयोजित केली आहे. यात बहुतांश क्रिकेटपटू असतील असे सूत्राने सांगितले. १७ एप्रिलला होणा-या विवाहाला फक्त कुटुंबिय उपस्थित असतील. स्वागत सोहळा त्याच दिवशी संध्याकाळी होईल.
विवाहापूर्वीच जाडेजाला सासरच्यांकडून ९७ लाखाची ऑडी क्यू ७ ची भेट
By admin | Published: April 05, 2016 3:52 PM