भुवनेश्वर : येथे २८ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषकात गटात अव्वल स्थान राखण्यासह उपांत्यपूर्व फेरी गाठण्यास भारतीय संघ प्राधान्य देणार असल्याची माहिती संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने दिली. विश्वचषक हॉकी स्पर्धा सुरू होण्यास दोन आठवडे शिल्लक आहेत. भारतीय संघदेखील तयारीवर अखेरचा हात फिरवित असून जगातील १८ अव्वल संघांमध्ये कलिंगा स्टेडियमवर विश्वचषकाच्या लढती रंगतील.
मनप्रीत म्हणाला, ‘आम्ही गटातील प्रत्येक साखळी सामना जिंकण्यास उत्सुक आहोत. प्रत्येक विजय तीन गुणांची कमाई करून देईल. गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक देण्यास प्राधान्य असेल. हा विश्वचषक असल्याने प्रत्येक संघ विजयाच्या इराद्यानेच खेळणार आहे. यामुळे कुणालाही सहजपणे घेता येणार नाही, मग तो द. आफ्रिका, कॅनडा किंवा तिसऱ्या स्थानावरील बेल्जियम असो.’क गटात भारताला सलामीचा सामना २८ नोव्हेंबर रोजी द. आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. २ डिसेंबर रोजी बेल्जियमविरुद्ध आणि ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्ध सामना होईल. भारत दोन वर्षांहून अधिक काळाहून मोठ्या स्पर्धांमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध खेळलेला नाही. मनप्रीतच्या मते सलामीचा विजय भारताला स्पर्धेतील वाटचालीसाठी मोलाचा ठरेल. (वृत्तसंस्था)गोल्ड कोस्ट येथे सराव सामन्याचा अपवाद वगळता आम्ही कुठल्याही मोठ्या स्पर्धेत द. आफ्रिकेविरुद्ध मागील दोन वर्षांत खेळलो नाही. ते कसे खेळतात, याचा वेध घेणे कठीण आहे.- मनप्रीत सिंग