लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सोमवारी एडिनबर्गमध्ये होणाऱ्या बैठकीत क्रिकेट इतिहास ढवळून टाकणारे निर्णय होण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्गमध्ये सोमवारपासून आठवडाभर कालावधीच्या बैठकीला प्रारंभ होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दोन विभाग करणे आणि वन-डे आंतरराष्ट्रीय लीगचे आयोजन करणे या विषयांचा बैठकीच्या अजेंडामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. आयसीसीने कसोटी मानांकनाला सुरुवात केली; पण त्यासाठी वापरली जाणारी पद्धत लक्षात घेता क्रिकेट चाहत्यांकडून प्रशंसा लाभली नाही. अनेक खेळाडू स्थानिक टी-२० क्रिकेट लीगकडे (आयपीएल) आकर्षित होत आहेत. हे खेळाडू कसोटी क्रिकेट खेळण्यापेक्षा कमीत कमी वेळेत अधिक पैसा मिळविण्यासाठी टी-२० लीग खेळण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे आयसीसीचे पदाधिकारी कसोटी क्रिकेटची लोकप्रियता टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कसोटी क्रिकेटला दोन गटांत विभागण्यात आले, तर प्रायोजकांना आकर्षित करता येईल आणि अधिक महसूल मिळवता येईल, असे आयसीसीला वाटते. आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे अनावरण करताना म्हटले होते की,‘आम्ही सर्व स्वरूपाच्या (कसोटी, वन-डे व टी-२०) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करीत आहोत.’ (वृत्तसंस्था)
कसोटी क्रिकेटमध्ये २ गट, वन-डे लीगला प्राधान्य
By admin | Published: June 27, 2016 3:51 AM