हैदराबाद : अखेरच्या चार मिनिटांमध्ये भक्कम बचाव करतानाच निर्णायक चढाया करत दबंग दिल्लीने गमावलेल्या सामन्यात पुनरागमन करत तामिळ थलाइवासचा प्रो कबड्डी लीगमध्ये अवघ्या एका गुणाने ३०-२९ असा थरारक पराभव केला. यासह दिल्लीने सलग दुसरा विजय मिळवताना १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
गचिबावली स्टेडियमवर तामिळ संघाने आक्रमक सुरुवात घेत दमदार आघाडी मिळवली होती. पहिल्या एका मिनिटाच्या खेळामध्ये एकही गुण नोंदला गेला नाही, मात्र यानंतर तामिळने पहिला गुण मिळवला आणि सातत्याने गुण मिळवत आपली पकड घट्ट केली. दिल्लीकरांनीही पुनरागमन करत ५-५ अशी बरोबरी साधली. मात्र दहाव्या मिनिटाला तामिळने दिल्लीवर लोण चढवून ११-६ अशी मजबूत आघाडी घेतली.
मध्यंतराला तामिळने १८-११ असे वर्चस्व राखत सामन्यावर नियंत्रण राखले. यावेळी तामिळ सहज बाजी मारेल असेच चित्र होते, परंतु दिल्लीने हळूहळू पुनरागमन करत सामन्यात रंग भरले. तामिळने अखेरच्या ४ मिनीटांपर्यंत आघाडी राखली होती. मात्र आक्रमकांकडून झालेल्या चुकांमुळे दिल्लीने ३७व्या मिनीटाला २९-२९ असे पुनरागमन केले. अखेरच्या मिनिटापर्यंत बरोबरी कायम राहिली. परंतु शेवटची चढाई निर्णायक ठरवताना नवीन कुमारने महत्त्वाचा गुण घेत दिल्लीचा विजय साकारला.
दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या नवीनने ८ गुण मिळवले, तर मेराज शेखने ६ गुणांची कमाई केली. तामिळचा हुकमी खेळाडू राहुल चौधरी ७, तर अजय ठाकूर व मनजीत चिल्लर प्रत्येकी ५ गुण मिळवण्यात यशस्वी ठरले.