स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात असाच एक निर्धाराने पक्का असलेला शेतकऱ्याचा मुलगा सर्वांचे लक्ष वेधत आहे. अनुप कुमारच्या नसण्याने यू मुंबा संघात निर्माण झालेली पोकळी महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई भरून काढत आहे. लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थने दोन सामन्यांत 28 गुणांची कमाई केली आहे. कामगिरीत सातत्य राखून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा त्याचा निर्धार आहे.
आई-वडील, एक भाऊ अशा छोट्याश्या कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थने स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. वडील शेतकरी आणि आई गृहीणी, त्यामुळे आर्थिक चणचण ही भासायची, परंतु त्याची सबब पुढे न करता सिद्धार्थ स्वप्नांच्या दिशेने चालत राहिला. सातव्या वर्षांपासून त्याने गावातच कबड्डीचे धडे गिरवले. पण, त्याला गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज होती. 'फिजिक्स बीएससी' चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुण्यातील सत्तेज बाणेर क्लबकडून खेळू लागला आणि तिथून त्याच्या व्यावसायिक कबड्डीला सुरूवात झाली.
प्रो कबड्डीच्या लिलावातून मिळालेल्या रकमेचं काय करणार या प्रश्नावर तो सुरुवातीला हसला आणि म्हणाला,''खूप काही करायचं आहे. घर घ्यायचं आहे, आई-वडिलांसाठी भावासाठी खूप काही घ्यायचं आहे. कारण, उभ्या आयुष्यात इतकी रक्कम मी कधी पाहिली नव्हती. पण, सर्वप्रथम मला माझ्या आईची इच्छा पूर्ण करायची आहे. ती म्हणजे फोर व्हीलर घेण्याची. त्यामुळे या पैशांनी प्रथम फोर व्हीलर खरेदी करून आईला त्यात बसवून फेरफटका मारून आणायचे आहे.''