मुंबई : प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने इतिहास रचला आहे. हा सिद्धार्थचा पहिलाच हंगाम. पण पहिल्याच हंगामातील फक्त चार सामन्यांमध्ये यू मुंबा संघाच्या सिद्धार्थने बळींचे अर्धशतक पूर्ण केले आहे. आतापर्यंत सिद्धार्थने दोनदा 'सुपर रेड' केल्या आहेत. त्याचबरोबर तीन सामन्यांमध्ये त्याने 10पेक्षा जास्त गुणांची कमाईही केली आहे.
आतापर्यंत अनुप कुमार आणि अजय ठाकूर या दोन नावाजलेल्या खेळाडूंच्या नावावर हा विक्रम होता. या दोन्ही खेळाडूंनी पाच सामन्यांमध्ये बळींचे शतक पूर्ण केले होते. पण सिद्धार्थने मात्र फक्त चार सामन्यांमध्येच हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरच्या सिद्धार्थला यू मुंबाने आपल्या चमूत दाखल करून घेतले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सिद्धार्थने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. यू मुंबाने 34 लाखांची बोली लावत सिद्धार्थला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते.
अनुप कुमारच्या नसण्याने यू मुंबा संघात निर्माण झालेली पोकळी महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई भरून काढत आहे. लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थने चार सामन्यांत 51 गुणांची कमाई केली आहे. कामगिरीत सातत्य राखून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा त्याचा निर्धार आहे.
प्रो-कबड्डीच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये ५० गुण मिळवणारे चढाईपटू –
१) सिद्धार्थ देसाई – ४ सामने२) अनुप कुमार – ५ सामने३) अजय ठाकूर – ५ सामने