आला मान खाली घालून, गेलेला कबड्डीपटू बनायला... हे टोमणे, अपयशावर हसणारे चेहरे आजही आठवतात. त्यांच्या याच नकारात्मक वागणुकीमुळेच मला लढण्याचे बळ दिले आणि आज मी एक उत्तम कबड्डीपटू झालो आहे.. आता तीच माणसं माझे कौतुक करताना थांबत नाहीत, महाराष्ट्रातील कबड्डीपटू श्रीकांत जाधव सांगत होता... प्रो कबड्डी लीगमध्ये तो यूपी योद्धा संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. प्रो कबड्डीमधील हे त्याचे चौथे सत्र असले तरी इथपर्यंतची त्याची वाटचाल काटेरी राहिली आहे. हलाखीची परिस्थिती, कबड्डीला घरच्यांचा विरोध, अपयशाचे सत्र, शेजाऱ्यांचे टोमणे या सर्वातून श्रीकांत उभा राहिला.
अहमदनगरमधील दहिगावणे खेड्यात श्रीकांतचे बालपण.. आई-वडील दोघेही शेतकरी... पंक्चरच्या छोट्याशा दुकानातून वडिलांनी शेतीसाठी जागा घेतली अन् श्रीकांतसह तीन भावंडांना वाढवले. श्रीकांत घरी मोठा असल्याने त्याने शिकावं आणि एक चांगली नोकरी करावी ही घरच्यांची इच्छा.. पण श्रीकांतला कबड्डीचे वेड.. २०११ साली त्याची भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली. पण २०१२ मध्ये काही कारणास्तव त्याला भारतीय क्रीडा प्राधिकरण ( साई) केंद्र सोडावे लागले. त्यानंतर शेजाऱ्यांचे टोमणे सुरू झाले, घरचेही विरोधातच होते. "या अशा परिस्थितीमुळे मी कबड्डी खेळणं सोडलं. सैन्य भरती प्रशिक्षणासाठी अकादमी जॉईन केली. तेथेही अपयश आले. नियतीने पुन्हा कबड्डी खेळण्याची संधी दिली. विदर्भातील अमरावती संघाचे प्रतिनिधित्व करताना कामगिरीचा आलेख उंचावला. प्रो कबड्डी लीगमध्ये जयपूर पिंक पॅंथर संघाने मला घेतले... पण," इतके सांगून श्रीकांत थांबला.