Pro Kabaddi League 2021-22 Day 2: प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात दुसरा दिवस दमदार सामन्यांनी सुरू झाला. पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने अखेरच्या दोन मिनिटांत मोठी आघाडी घेत जयपूरला धूळ चारली. तर दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणला नमवत दबंग दिल्ली विजयी सलामी दिली.
गुजरातचा जयपूरवर दणकेबाज विजय (३४-२७)
गुजरातच्या संघाकडून सुरूवातीपासून आक्रमक खेळ पाहायला मिळाला होता. तर जयपूरचा संघ त्यांची आक्रमणं परतावून लावण्यात यशस्वी होत होते. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांच्या गुणांमध्ये केवळ २ गुणांचा (१९-१७) फरक होता. त्यानंतर सामना संपायला दोन मिनीटे शिल्लक असेपर्यंत हा फरक तसाच होता. शेवटच्या काही सेकंदांच्या खेळात जयपूरच्या अर्जून देशवालने चांगले गुण कमावले. त्याने १० गुणांची कमाई केली. पण गिरीश एर्नाक आणि राकेश नरवाल यांच्या प्रत्येकी ७-७ गुणांनी गुजरातला विजय मिळवून दिला.
दबंग दिल्लीने दिली विजयी सलामी (४१-३०)
दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण यांच्यातील स्पर्धेचा इतिहास पाहता सामना रंगतदार होईल असं वाटत होतं. पण नवीन कुमारने दिल्लीचं पारडं सुरूवातीपासूनच जड ठेवलं हाफ टाईमपर्यंत दिल्लीचा संघ २२-१५ने आघाडीवर होता. त्यानंतर उत्तरार्धाच्या खेळातही पुणेरी पलटणला फारसे गुण जमवता आले नाहीत. नवीन कुमारने दमदार कामगिरी सुरू ठेवत सामन्यात १४ रेड पॉईंट्ससह १६ गुण मिळवले. त्याच्यापुढे पुणेरी पलटण अजिबातच निभाव लागला नाही.
पाटणाने शेवटच्या काही सेकंदात मारली बाजी (४२-३९)
दिवसाच्या तिसऱ्या सामन्यात चाहत्यांना थरारक खेळ पाहायला मिळाला. पाटणा पायरेट्स संघाचा हरयाणा संघाविरूद्धचा इतिहास फारसा चांगला नसूनही त्यांनी आक्रमक खेळ केला. हाफ टाईमनंतरही त्यांचा आक्रमकपणा कमी झाला नाही. असं असलं तरी हरयाणा संघाने वेळोवेळी गुण मिळत राहून कमीत कमी अंतर राखायचा प्रयत्न केला. शेवटच्या चढाईच्या वेळी तर गुण ३९-४० असे होते. त्यावेळी मनू गोयतने चढाई (रेड) करत संघाला महत्त्वपूर्ण दोन गुण मिळवून दिले आणि विजयी केले. मनूने ११ रेड पॉईंट्ससह एकूण १५ गुण मिळवले. तोच या सामन्याचा हिरो ठरला.